उड्डाणपुलाला विरोध नाही, मग रस्त्यांना का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:11 AM2021-06-11T04:11:15+5:302021-06-11T04:11:15+5:30
नाशिक : सिडकोतील उड्डाणपुलाला भाजपचा कधीही विरोध नव्हता. महापालिका आयुक्तांनी आर्थिक स्थिती चांगली नसल्याने प्रसंगी विकास कामे रद्द करू ...
नाशिक : सिडकोतील उड्डाणपुलाला भाजपचा कधीही विरोध नव्हता. महापालिका आयुक्तांनी आर्थिक स्थिती चांगली नसल्याने प्रसंगी विकास कामे रद्द करू असे सांगितल्यानंतर मी अन्य प्रभागातही विकासकामे व्हावीत यासाठीच उड्डाणपुल रद्द करा आणि ती रक्कम अन्य प्रभागातील विकासकामांसाठी खर्च करावी असे सांगितले, यात काय चुकले, असा प्रश्न करीत महापौर सतीश कुलकर्णी यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. सिडकोतील उड्डाणपुलास विरोध केल्याचा आरोप शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी केल्यानंतर भाजप आणि महापौर यांच्यात जुंपली आहे. उड्डाणपुलाच्या वादासंदर्भात महापौर कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना भूमिका मांडली.
प्रश्न- सिडकोतील उड्डाणपुलाला विरोध करण्याचे कारण काय?
कुलकर्णी - आरोप करण्याआधी संबंधितांनी आधी बाजू समजून घेतली पाहिजे. मायको सर्कल आणि सिडकोत उड्डाण पूल व्हावा यासाठी भाजपनेच मंजुरी दिली आहे. हे उड्डाणपुल बांधायचे नसते तर त्याला महासभेत आणि पुढे स्थायी समितीच्या बैठकीत देखील मंजुरी दिली नसती. त्यामुळे सिडकोवासीयांच्या विषयी आकस असल्याचा प्रश्न अत्यंत गैरलागू आहे. हे पूल मंजूर झाल्यानंतर देखील नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे होत नाहीत, अशी ओरड असताना आयुक्तांनी प्रसंगी विकासकामे रद्द करू असे मत व्यक्त केले. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांत अस्वस्थता निर्माण झाली. त्यामुळे विकासकामेच रद्द करायची असतील तर उड्डाणपूल रद्द करा आणि सर्व पक्षांतील नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे करा, अशी भूमिका मी मांडली. यात गैर काहीच नव्हते.
प्रश्न- सिडकोतील पूल तीन वर्षांत पूर्ण करायचा असल्याने सर्व निधी आताच खर्च होणार नव्हता. मग विरोध कशासाठी?
कुलकर्णी - शहराचा विकास आराखडा १९९३ मध्ये मंजूर झाला. त्यावेळी जे रस्ते मंजूर झाले, असे अनेक रस्ते अजूनही तयार झालेले नाहीत. असे रिंगरोड विकसित झाले तर नागरी वसाहती, व्यापार वाढून महापालिकेलाच फायदा होणार आहे. सातपूरसह अन्य खेड्यांमध्ये जाऊन बघा, तेथे चालण्यासाठी रस्ते नाहीत, मग हे रस्ते केव्हा करणार, हा प्रश्न आहे. ज्या प्रमाणे उड्डाणपुलासाठी एकाच वर्षात निधी लागणार नाही, तसेच डीपी रोडसाठी एकाच वर्षात रक्कम देण्याची गरज नाही. आता पावसाळा सुरू झाला आहे. रस्त्याची कामे सप्टेंबर महिन्यानंतरच होऊ शकतात. त्यामुळे रस्त्यांना देखील विरोध करण्याचे कारण नाही.
प्रश्न - भाजप, सेनेचे आरोप प्रत्यारोप व्यक्तिगत पातळीवर सुरू झाले आहेत.
कुलकर्णी - मी कोणावरही व्यक्तिगत आरोप केलेले नाहीत. कारण आरोप - प्रत्यारोपापेक्षा चर्चेमुळे प्रश्न सुटतात असे माझे मत आहे. बडगुजर यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी आरोप केल्याचे शल्य त्यांना असेल तर त्यांच्यावर अशी वेळ का आणली याचे आत्मपरीक्षण देखील संबंधितांनी केले पाहिजे.