पालघर नको, दिंडोरी मतदारसंघच हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 01:49 AM2019-03-12T01:49:29+5:302019-03-12T01:50:04+5:30
लोकसभा निवडणुकीत पालघर आणि दिंडोरी अशा दोन लोकसभा मतदारसंघांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दावा सांगितला असला तरी आता मात्र या पक्षाला महाआघाडीकडून दिंडोरी मतदारसंघच हवा असून, तसा निर्णय सोमवारी (दि.११) जिल्हा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
नाशिक : लोकसभा निवडणुकीत पालघर आणि दिंडोरी अशा दोन लोकसभा मतदारसंघांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दावा सांगितला असला तरी आता मात्र या पक्षाला महाआघाडीकडून दिंडोरी मतदारसंघच हवा असून, तसा निर्णय सोमवारी (दि.११) जिल्हा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
समितीची बैठक जिल्हा सरचिटणीस सुनील मालुसरे आणि आमदार जिवा पांडू गावित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी याबाबत चर्चा करण्यात आली. यापूर्वी महाआघाडीत गेलेल्या माकपाने पालघर आणि दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघांवर दावे सांगितले होते. परंतु, सोमवारी झालेल्या बैठकीत या दोन्ही मतदारसंघांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस जिल्हा समिती सदस्य सुभाष चौधरी, इंद्रजित गावित, गणेश चौधरी, देवराम गायकवाड यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
स्थानिक पातळीवर अधिकार
कोणत्या मतदारसंघाची निवड करायची हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवर ठरविण्यास सांगितले आहे. त्यानुसार पक्षाने दिंडोरी मतदारसंघावर दावा केल्याची माहिती सरचिटणीस सुनील मालुसरे यांनी दिली.