नो पार्किंग फलक नसल्याने पोलिसांची झाली सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2016 11:31 PM2016-06-22T23:31:07+5:302016-06-23T00:04:09+5:30
नो पार्किंग फलक नसल्याने पोलिसांची झाली सोय
नाशिक : महापालिकेच्या वतीने शहरात नो पार्किंगचे फलक नसल्याने वाहतूक पोलिसांचे फावले असून, कोणालाही अडवून दंडाची वसुली म्हणून चिरीमिरी घेतली जात आहे. द्वारका परिसरात असाच अनुभव आलेल्या मानसोपचारतज्ज्ञाने यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
दोन दिवसांपूर्वी द्वारकावरील हॉटेल राधिका परिसरात दिलीप ताईपले यांना पोलिसांच्या सोयीच्या कारभाराचा कटू अनुभव आला. कोणत्याही प्रकारे नो पार्किंगचा फलक नसताना पोलिसांनी ताईपले यांना अडवून नो पार्किंगच्या जागी मोटार उभी का केली असे सांगून वाद घातला आणि शंभर रुपयांची पावतीही दिली. त्यावर सही शिक्का नसून त्यामुळे ही पावती बनावट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे संबंधित अधिकारी वाहतूक खात्याचा नसतानाही त्याने वसुली केली आणि याच ठिकाणी उभ्या असलेल्या अन्य मोटारचालकांवर मात्र कोणतीही कारवाई न करता त्यांना सोडून दिले. (प्रतिनिधी)