शाळा नाही, तर शुल्कही नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 06:05 PM2020-07-18T18:05:32+5:302020-07-18T18:20:53+5:30
कोरोना संकटामुळे अनेक विद्यार्थ्यांचे पालक नोकरीतून कमी करण्यात आल्याने बेरोजगार झाले असून, अशा परिस्थितीत निश्चित उत्पन्नाचा स्रोत नसल्याने शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क माफ करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
नाशिक : कोरोना संकटामुळे अनेक विद्यार्थ्यांचे पालक नोकरीतून कमी करण्यात आल्याने बेरोजगार झाले असून, अशा परिस्थितीत निश्चित उत्पन्नाचा स्रोत नसल्याने शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क माफ करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
'शाळा नाही, तर शुल्कही नाही' अशी भूमिका पालकांनी घेतली आहे. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाचा उद्रेक सुरूच आहे. या कालावधीत महाराष्ट्र शासनाने २३ मार्च २०२० पासून लॉकडाऊनच्या सत्रात सर्व शाळा, कॉलेज ही बंद ठेवली. त्यामुळे अनेक पालकांचे व्यवसाय व उद्योग ठप्प झाले आहे. बहुतांश पालकांना नोकरीवरून कमी केले असून, काहींना पगारही मिळत नाही. त्यामुळे जवळपास सर्वच पालकांना याचा मोठा फटका बसला आहे. अशा स्थितीत कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर उभा असून, पालकांची परिस्थिती हालाकीची व अडचणीची झाली आहे. पालकांच्या अडचणी लक्षात घेऊन शाळेने फी माफ करावी या संदर्भात बाल विद्या प्रसारक मंडळ संचलित आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुख्याध्यापक व विश्वस्त मंडळाकडे निवेदन देत शाळेकडून आकारले जाणारे शुल्क कमी करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे शाळा बंद असलेल्या कालावधीतील बस व व्हॅन यांचीदेखील फी आकारण्यात येऊ नये, अशी मागणी पालक अॅड. अमोल घुगे, एस. ए. दीक्षित, ज्योती कोळी, इब्राहिम अत्तार, अॅड. किरण वांद्रे, सुमंत वैद्य, पूनम राऊत, पूनम ठाकूर, शांताराम शेवाळे, माधुरी मोझर, समिर तांबट, अंजली सोनजे, मयुरी सोनवणे आदी पालकांनी निवेदनाचा माध्यमातून केली आहे.