ना आचारसंहिता भंग, ना तक्रारी !
By admin | Published: February 10, 2017 12:55 AM2017-02-10T00:55:36+5:302017-02-10T00:55:45+5:30
प्रशासन समाधानी : राजकीय पक्ष समजदार
नाशिक : जिल्ह्यात महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता जारी असताना त्याचे तंतोतंत पालन करण्याच्या प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांनी पालन केले असून, पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहिते दरम्यान प्राप्त झालेल्या चार तक्रारींव्यतिरिक्त जिल्ह्यात एकही आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल झालेली नाही हे विशेष.
जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता जारी असल्याने त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्वच शासकीय यंत्रणेवर सोपविण्यात आली असून, तालुका पातळीवर व उमेदवारांच्या मतदारसंघात आचारसंहितेचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी पथके तैनात करण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करून चोवीस तास या कक्षात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. कक्ष सुरू झाल्यापासून पहिल्या आठवड्यात लागोपाठ चार तक्रारी करण्यात आल्या, त्यात भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी ग्रीम जीमचे लोकार्पण करून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार करण्यात आली होती, तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक भरतीचे दिलेले आश्वासन तसेच वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिक्षकांना विम्याचे कवच देण्याची केलेल्या घोषणेबद्दलही तक्रारी करण्यात आल्या होत्या. नाशिक सहकारी साखर कारखान्यावर राज्य सरकारने प्रशासकीय मंडळ नियुक्त केल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार करण्यात आल्यावर या सर्व तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, आमदार सानप यांच्या आमदार निधीतून कोणतेही काम करण्यात आलेले नसल्याचा अहवाल प्रांत अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे ही तक्रार निकाली काढण्यात आली. विनोद तावडे व मुनगंटीवार यांच्या विषयी तक्रारींची शहानिशा करण्यासाठी थेट राज्याच्या आाचारसंहिता कक्षाकडे तक्रार पाठविण्यात आली. (प्रतिनिधी)