नववसाहतींमध्ये ना पाणी, ना धड रस्ते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:14 AM2020-12-22T04:14:31+5:302020-12-22T04:14:31+5:30

नाशिक : कोणत्याही भागात नवीन वसाहत विकसित होताना रस्ते, पाणी, गटारी अशा मूलभूत सुविधांसाठी नगररचना विभागाकडून विकास शुल्क ...

No water, no roads in the new colonies! | नववसाहतींमध्ये ना पाणी, ना धड रस्ते !

नववसाहतींमध्ये ना पाणी, ना धड रस्ते !

Next

नाशिक : कोणत्याही भागात नवीन वसाहत विकसित होताना रस्ते, पाणी, गटारी अशा मूलभूत सुविधांसाठी नगररचना विभागाकडून विकास शुल्क घेतले जात असले तरी अशाप्रकारे शुल्क भरूनदेखील सुविधाच मिळत नसल्याने नवविकसित भागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

कोणत्याही वसाहतीत रस्ते, पाणी, गटारी, पथदीप अशा मूलभूत सुविधा देणे महापालिकेला बंधनकारक आहे. मात्र, त्यानंतरदेखील अशाप्रकारे सुविधा दिल्या जात नाही. पाथर्डी फाटा येथील नवविकासित भाग, वडनेर गेट, जयभवानी रोड, सातपूर-अंबड लिंकरोडवरील दत्तनगर आणि अन्य भाग तसेच नाशिकरोड विभागात एकलहरा रोड, सायखेडा रोड, सौभाग्यनगर, पंचवटीत कोणार्कनगर, आडगाव परिसर, अमृतधाम, मखमलाबाद राेड, सातपूर येथे बारदान फाटा अशा अनेक भागात नवीन इमारती उभ्या राहत आहेत. मात्र, अनेक भागात खडीचे रस्ते असून, पाणीपुरवठ्याच्या जोडण्याही वेळेत नाही. काही ठिकाणी पथदीपांचे केवळ खांब उभे आहेत. गटारीच्या जोडण्याही अनेक भागात झालेल्या नाहीत. महापालिकेत २३ खेडी समाविष्ट झाल्यानंतर या भागासाठी प्रत्येक महापौर राखीव निधीची घोषणा करून अगदी खासगी मळ्यात रस्ते तयार केले जातात. मात्र, नववसाहतीत राहण्यास येणाऱ्यांचे हाल होतात. बळी तो कानपिळी अशीच अवस्था असून, काही निवडक भागातच अशाप्रकारच्या सुविधा दिल्या जातात.

कोट...

रस्ता, वीज, पाण्याच्या समस्या कायम

शहरातील रस्ते तयार करताना किमान त्या भागात ५० टक्के लोकवसाहत झालेली असावी अशी महापालिकेत नियमावली आहे. मात्र, अशाप्रकारे पन्नास टक्के नागरिक रहण्यास येईपर्यंत अन्य भागातील नागरिकांंनी हाल-अपेष्टा सहन करायच्या का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रस्ते ठीक; परंतु पाण्याची जोडणीही वेळेत मिळत नाही. पथदीपदेखील लवकर दिले जात नाही. काही ठिकाणी नगरसेवकांकडून बिल्डरशी असलेल्या घेण्या-देण्यामुळेदेखील रहिवाशांना फटका बसत असल्याच्या तक्रारी आहेत, तर दुसरीकडे ‘वट’ असणारे विकासक अगोदरच सुविधा देतात.

कोट...

दत्तनगर या भागात रस्ते, पाणी, गटारी अशा कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे नागरिकांना गटारी रस्त्यात सोडून द्याव्या लागल्या आहेत. पाण्याची तर भीषण समस्या असून, महिला वर्गाचे हाल हाेतात. या भागात महापालिकेची शाळा नाही की एखादा दवाखानाही नाही. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

-रामदास दातीर, रहिवासी, दत्तनगर

कोट...

कोणार्कनगर दोन या भागात विकास शुल्क भरूनही अनेक समस्या आहेत. मूलभूत सुविधा नसल्याने या भागात नागरिक घरे घेेण्यास कचरतात. विकासकांची गुंतवणूकदेखील अडकून असते. लाखो रुपयांची विकास शुल्क भरूनदेखील उपयोग होत नसेल तर नागरिकांनी काय करायचे? समस्या दूर करणे गरजेचे आहे.

-अभय माळोदे, कोणार्कनगर, दोन

-----कोट...

साधारणत: पन्नास टक्के लोकसंख्या त्या भागात झाली की त्या ठिकाणी रस्ते, पाणी, गटारी अशा सुविधा देण्याचे महापालिकेचे धोरण आहे. त्यानुसार कामे केली जातात. नवीन ले-आउटमध्ये लेाकसंख्या वाढली की, किमान खडीचे रस्ते तयार केले जातात. एक ते दोन वर्षांनी तेथे डांबरीकरण केले जाते. आताही रस्त्याचा प्रस्ताव आहे, मात्र तो न्यायप्रविष्ट आहे.

-संजय घुगे, शहर अभियंता, महापालिका

-इन्फो..

या वसाहती बनल्या समस्यांचे माहेरघर

दत्तनगर, चुंचाळे, खुटवडनगर, पाथर्डी परिसर, वडनेर गेट, तवली फाटा, कोणार्कनगर, कर्मयोगीनगर, अमृतधाम, रासबिहारी स्कूलमागील, अयोध्यानगर, हिरावाडी, बळवंतनगर, धु्वनगर, मखमलाबाद रोड, हनुमानवाडी रोड.

इन्फो...

या आहेत समस्या

चेहेडी पंपिग परिसरात तसेच पवारवाडी आणि वडनेर परिसरात रस्ते, पाणी, गटारी अशा सर्वच समस्या आहेत. कोणार्कनगर परिसर मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्या ठिकाणीदेखील रस्ते विकसित झालेले नाहीत. सातपूर येथील बारदान फाटा भागातदेखील अनेक वसाहतींमध्ये समस्या आहेत. तवली फाटा, म्हसरूळ-वरवंडी परिसरातही समस्या कायम आहेत.

...छायाचित्र राजू ठाकरे देणार आहेत.

Web Title: No water, no roads in the new colonies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.