यंदा कोणतीही लाट नाही : संजय राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:44 AM2019-04-19T00:44:34+5:302019-04-19T00:45:16+5:30
देशातील जनतेत २०१४ मध्ये असलेली लाट यंदाच्या निवडणुकीत नाही. कोणतीही लाट परत परत कधी येत नाही आणि अशा लाटेवर पुन्हा निवडणूक लढविलीही जात नाही.
नाशिक : देशातील जनतेत २०१४ मध्ये असलेली लाट यंदाच्या निवडणुकीत नाही. कोणतीही लाट परत परत कधी येत नाही आणि अशा लाटेवर पुन्हा निवडणूक लढविलीही जात नाही. त्याचप्रमाणे २०१४च्या पूर्वी असलेल्या मुद्द्यांच्या आधारे मतेही मागता येणार नाहीत, असे शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
नाशिक येथे राऊत यांनी पत्रकारांशी गुरुवारी मुक्त संवाद साधला. विरोधी पक्षांकडे पंतप्रधानपदासाठी पाच उमेदवार आहेत, या छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले, ज्या ठिकाणी पाच उमेदवार पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहेत, याचाच अर्थ त्यांचा पराभव निश्चित आहे. कारण एकापेक्षा अधिक लोक पदासाठी इच्छुक असल्यास ते सरकार कायम कमकुवत असते. एनडीएमध्ये सर्व पक्षांनी एकत्र येऊन पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे एकमेव नाव निश्चित केले आहे, असे सांगून राऊत यांनी वंचित आघाडी ही भाजपची बी टीम असल्याच्या आरोपाचे खंडन केले. रिपाइंचे सर्व गट निस्तेज झाले असून, त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन रालोआत सामील व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यात काही जागांवर शिवसेना व भाजपच्या उमेदवारांनी बंडखोरी केली असली तरी, अशा बंडखोरांवर दोन्ही पक्षांकडून कारवाई केली जात आहे. स्थानिक पातळीवर काही मतभेद असतील तर ते स्थानिक पातळीवरच चर्चा करून मिटविण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.