हाताला काम नाही अन् शेतात पीकही नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 09:05 PM2020-07-22T21:05:52+5:302020-07-23T01:01:43+5:30
पेठ : ऐन पावसाळ्यात पावसाने डोळे वटारल्याने पेठ तालुक्यात भात, नागलीसह वरई पीकही कोमेजून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनमुळे रोजंदारी नाही आता पीकही वाया गेल्याने आदिवासी भागातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
पेठ : ऐन पावसाळ्यात पावसाने डोळे वटारल्याने पेठ तालुक्यात भात, नागलीसह वरई पीकही कोमेजून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनमुळे रोजंदारी नाही आता पीकही वाया गेल्याने आदिवासी भागातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास अडीच महिन्याचा कालावधी लोटला असून, सुरुवातीच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी लावणी केलेले नागली व वरई ही दोन्ही पिके ऐन वेळी पावसाने दडी मारल्याने रोपांच्या अक्षरश: काड्या झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यावर ऐन पावसाच्या दिवसात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, आधीच कोरोनाचे संकट डोक्यावर असताना आता खरीप हंगाम वाया जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरवर्षी भात व नागलीची लावणीनंतर बहुतांश शेतकरी मजुरीसाठी स्थलांतरित होतात. मात्र लॉकडाऊन-मुळे हाताला काम नाही व शेतात पीक नाही अशी गत झाली आहे. पर्यायी पिकांची चाचपणी भात किंवा नागलीचे पीक लावणीनंतर साधारण ९० ते १२० दिवसात येते. त्यातील ५५ दिवस उलटून गेल्याने आता लावणी करूनही उत्पादन येईल याची शाश्वती नसल्याने खरिपाची पिके पूर्णपणे वाया जाणार आहेत.
शिवाय रोपे नसल्याने दुबार लावणी शक्य नसल्याने उर्वरित ४० ते ४५ दिवसात येणाºया पर्यायी पिकांची चाचपणी करण्याची मागणी होऊ लागली असून, कृषी विभागाने या संदर्भात मार्गदर्शन करून कमी कालावधीत व हवामानानुसार कोणती पिके घेता येतील त्याची बियाणे मोफत वाटप करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.
-------------------------
जून महिन्यात थोडाफार पाऊस झाल्याने माळरानावर नागली व वरईची लावणी केली; मात्र जुलैमध्ये कडक ऊन पडल्याने पूर्ण रोपे जळून खाक झाली असून, बियाणे, खते, मजुरी सर्व खर्च वाया गेला आहे. या वर्षी कोरोनामुळे ना शेती करता येत ना मजुरीला जाता येत, अशी शेतकरी व मजुरांची बिकट स्थिती झाली आहे.
- जितेंद्र मोहरे, कळमबारी