चुकीच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांकडून रात्रीची कांदा लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 07:53 PM2020-12-25T19:53:31+5:302020-12-26T00:40:44+5:30
खामखेडा : रोप उशिरा लागवडीला आल्याने सध्या खामखेडा परिसरात उन्हाळ कांदा लागवडीस सुरुवात झाली आहे; मात्र परिसरात आठवड्यातील तीन दिवस रात्रीचा वीज पुरवठा होत असल्याने येथील शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत रात्रीची कांदा लागवड करत मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
डिसेंबर महिन्यात वीज वितरण कंपनीच्यावतीने आठवड्यातील तीन दिवस रात्री ९.३० ते सकाळी ७.३० असे वीज पुरवठ्याचे धोरण राबवण्यात येत असल्याने ऐन उन्हाळ कांदा लागवडीच्या कालावधीत शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींना निवेदने देत वेळ बदलण्याची विनंती केली; मात्र शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे आठवड्यातील फक्त चारच दिवस शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असल्याने या कालावधीतच फक्त कांदा लागवड करता येते. रात्रीच्या वेळेत वीज असलेल्या दिवशी मात्र शेतकऱ्यांना लागवड करता येत नाही. यावर्षी शेतकऱ्याची कांदा रोपे मोठ्या प्रमाणावर खराब झाली. काहींनी दुबार तर काहींनी तिबार रोपे टाकलीत. महागडी रोपे असल्याने त्यांची वाढ व उगवण क्षमता योग्य दिसून येत नाही व ढगाळ वातावरणाने लागवडीला आलेली रोपे खराब होत असल्याने रात्रीची जोखीम पत्करून कडाक्याच्या थंडीत अनेक शेतकऱ्यांना कांदा लागवड करावी लागत आहे.