खासगी वाहनचालकांचा घुमतोय पिंपळगाव बसस्थानकात आवाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 10:32 PM2020-01-25T22:32:03+5:302020-01-26T00:17:28+5:30
स्थानकात वेळेवर बसेस येत नसल्याने प्रवासी वाहतूक करणारे खासगी वाहनचालक स्थानकात प्रवेश करत प्रवासी पळवून नेत आहे. बसस्थानकात बसेसपेक्षा खासगी वाहनांची रेलचेल दिसत येत आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना सुविधा देऊन नादुरुस्त बसेस दुरुस्त करत त्या वेळेवर सोडण्याची मागणी सर्वसामान्य प्रवाशांनी केली आहे.
पिंपळगाव बसवंत : येथील स्थानकात वेळेवर बसेस येत नसल्याने प्रवासी वाहतूक करणारे खासगी वाहनचालक स्थानकात प्रवेश करत प्रवासी पळवून नेत आहे. बसस्थानकात बसेसपेक्षा खासगी वाहनांची रेलचेल दिसत येत आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना सुविधा देऊन नादुरुस्त बसेस दुरुस्त करत त्या वेळेवर सोडण्याची मागणी सर्वसामान्य प्रवाशांनी केली आहे.
येथील स्थानकात बसेस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे संधी साधून खासगी वाहनचालक स्थानकात एन्ट्री घेतात. ‘चलो नाशिक, चलो नाशिक’ची आरोळी देत प्रवासी पळवतात. बसेसच उपलब्ध नसल्याने अनेकांना नाइलाजाने खासगी वाहनांमध्ये जीवघेणा प्रवास करावा लागतो. ग्रामीण भागातील जीवनवाहिनी’ असे जिचे वर्णन केले जाते, त्या एसटीची अवस्था तालुक्याच्या ठिकाणी प्रवास करतानादेखील कठीण आहे.
निफाड तालुक्यातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे तालुक्याला जाणाऱ्या बसेसचे तीन तेरा वाजले आहेत. या बसेस कधीच वेळेवर पोहोचत नाहीत. त्यामुळे बेकायदा प्रवासी वाहतूक करणाºया खासगी वाहनांचा प्रवाशांना आसरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना असुरक्षित प्रवास करावा लागत असून, आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे बिरुद मिरवणारी एसटी ग्रामीण भागात प्रवाशांसाठी बिनभरवाशाची ठरत आहे.
पिंपळगाव शहरातील नोकरदारांना, ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी एसटी बस हा चांगला पर्याय आहे. मात्र अनेकदा वेळेवर गाडीच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मासिक पासधारक प्रवासी, शेतकरी, नोकरदार व सवलतीच्या दराने प्रवास करणाºया विद्यार्थ्यांना नाहक फटका बसतो. त्यांच्याकडे खासगी वाहतूक करणाºया वाहनांशिवाय दुसरा पर्याय नसतो. शहरातून जवळपास हजारो प्रवासी एसटी बसने प्रवास करतात. मात्र वेळेवर बस नसल्याने खासगी वाहनाने प्रवास करून इच्छित स्थळ गाठावे लागते. त्यामुळे नादुरुस्त बसेसची दुरुस्ती करून त्या वेळेवर सोडाव्यात, अशी मागणी जोर प्रवाशांनी केली आहे.
पिंपळगाव स्थानकात वेळेवर बस येत नाही व टोल नाक्यावरील अवाच्या सव्वा टोल वसुलीमुळे वर्षभरात आगाराला १२ लाख रु पयांचा टोल भरावा लागला आहे. उत्पन्न कमी आणि टोलची रक्कम अधिक यामुळे महामंडळ तोट्यात आहे. महामंडळाने या बाबीचा गांभीर्याने विचार करून ग्राहकसेवा पुरविण्यावर भर देण्याची गरज आहे. बसस्थानकातून प्रवासी घेऊन जाण्याला जबाबदार कोण, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- मयूर गावडे, सामाजिक कार्यकर्ते पिंपळगाव बसवंत
बस वेळेवर येत नसल्याने नाइलाजाने खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. बसेस वेळेवर आल्या आणि त्या अद्ययावत असला तर प्रवास सुखकारक होईल.
- रमेश गायकवाड, प्रवासी