राष्ट्रवादीत नाराजीचे सूर
By Admin | Published: February 9, 2017 12:27 AM2017-02-09T00:27:20+5:302017-02-09T00:27:30+5:30
जागांवर परिणाम होण्याची शक्यता
नाशिक : शिवसेनेत अंतर्गत बंडाळी होण्याची चिन्हे दिसत असतानाच जिल्हा परिषदेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीतही उमेदवारीवरून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रा. प्रवीण गायकवाड यांंनी शिवबंधन बांधत नागडे गणातून केलेली शिवसेनेची उमेदवारी चर्चेत आहे.
निफाड तालुक्यातील देवगाव गटातून माजी खासदार स्व. डॉ. वसंत पवार यांच्या कन्या अमृता पवार यांना उमेदवारी दिल्याने तेथून राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले माजी सदस्य हरिश्चंद्र भवर अपक्ष उमेदवारी करीत आहेत. तीच बाब राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदाची संधी लाभलेले माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या बाबतीत असून, त्यांनी उगावमधून अपक्ष उमेदवारी करण्याची तयारी चालविली आहे. उमराणे गटातून विद्याथी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक वाघ इच्छुक असताना तेथून पक्षात ऐनवेळी दाखल झालेले यशवंत शिरसाट यांना उमेदवारी मिळाल्याने दीपक वाघ नाराज असल्याचे समजते. दीपक वाघ यांच्यासाठी थेट प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी जिल्ह्णातील पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देण्याच्या सूचना दिल्याची चर्चा आहे. पाटोदा गटातून अन्य गटातील उमेदवार दिल्याने राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी नाराज होते. माजी सदस्य बाळासाहेब पिंपरकर यांनी तर माध्यमांकडे धाव घेऊन नाराजी व्यक्त केली होती. इगतपुरी तालुक्यातील उमेदवार निवडीत तालुकाध्यक्ष गोरख बोडके यांनी मनमानी वागत तिकिटे वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील वाजे यांनी केला आहे. सुनील वाजे यांच्या पत्नी सुजाता वाजे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सहयोगी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत. नाशिक तालुक्यातही विष्णुपंत म्हैसधुणे यांना पळसे गटातून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची तयारी केली आहे. दिंडोरीत वसंत वाघ यांना डावलून भास्कर भगरे यांना उमेदवारी दिल्याने वाघ समर्थक नाराज असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)