नगर परिषदेची अवाजवी घरपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 10:16 PM2020-08-14T22:16:47+5:302020-08-15T00:24:42+5:30
सिन्नर नगर परिषदेने शहरवासीयांना पाठवलेली घरपट्टी अवाजवी असून, त्यात अवास्तव करांची जंत्री आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर घरपट्टी व पाणीपट्टीच्या बिलांमध्ये नगर परिषदेने २५ टक्के सवलत द्यावी. तसेच व्याज आकारणी माफ करावी, अशी मागणी सिन्नर शहर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी संजय केदार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
सिन्नर : नगर परिषदेने शहरवासीयांना पाठवलेली घरपट्टी अवाजवी असून, त्यात अवास्तव करांची जंत्री आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर घरपट्टी व पाणीपट्टीच्या बिलांमध्ये नगर परिषदेने २५ टक्के सवलत द्यावी. तसेच व्याज आकारणी माफ करावी, अशी मागणी सिन्नर शहर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी संजय केदार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
नगर परिषदेने २०१९ ते २०२० या वर्षीच्या घरपट्टी व नळपट्टी ग्राहकांना पाठवली आहे. घरपट्टीत अग्निशमन कर, वृक्ष कर, शिक्षण कर आदींसह इतर अनावश्यक करांचा समावेश आहे. थकीत बिलामध्ये व नियमित बिलांमध्ये व्याज आकारणी लावली आहेत. सध्या देशभर कोविडत-१९चे वैश्विक थैमान असताना संकट काळात सामान्य व मध्यमवर्गीय नागरिक आर्थिक संकटांनी भरडलेले आहेत. एका बाजूला जगण्याची भ्रांत असताना पठाणी पद्धतीने पाठवलेली अवाजवी जाचक घरपट्टी कशी भरायची, अशा विवंचनेत सामान्य नागरिक सापडला आहे.
नगरपालिकेने मूळ रकमेच्या घरपट्टीत २५ टक्के सवलत द्यावी. चार दिवसाआड होणारा पाणीपुरवठा लक्षात घेता पाणीपट्टी ३६५ दिवसांची आकारली जाते. त्यात ५० टक्के सवलत द्यावी तसेच व्याज आकारणी न करता सवलतीच्या दरात ग्राहकांकडून आकारणी करावी. तशा आशयाचा ठराव नगरपालिकेने जनरल मिटिंगमध्ये करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली. यावेळी किरण मुत्रक, दत्ता वायचळे, डॉ. विष्णू अत्रे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, रवींद्र काकड, अनिल वराडे, सुभाष कुंभार, हर्षद देशमुख, कैलास झगडे, संजय काकड, डॉ. संदीप लोंढे. डी.डी. गोरडे, दत्तात्रेय डोंगरे, संजय वराडे आदी उपस्थित होते.