मनपा शिक्षण मंडळ भरविणार ‘नापासांची शाळा’
By admin | Published: August 27, 2016 10:51 PM2016-08-27T22:51:18+5:302016-08-27T22:51:29+5:30
उपक्रम : १३६ मुलांचे उजळणार भवितव्य; महापालिका शाळांमध्ये रोज भरणार वर्ग
नाशिक : महापालिका शिक्षण मंडळाने मागील आठवड्यात राबविलेल्या शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेत नववीत नापास झाल्याने शाळेलाच रामराम ठोकणारी १३६ मुले आढळून आली आहेत. या मुलांना आता पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी मनपा शाळांमध्ये रोज सायंकाळी ‘नापासांची शाळा’ भरविण्याचा उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
मनपा शिक्षण मंडळाने मागील आठवड्यात मोबाइल अॅपमार्फत नोंद घेत १२६८ शाळाबाह्य मुले आढळून आली होती. यामध्ये सर्वाधिक मुले पंचवटी विभागात आढळून आली. दरम्यान, शाळाबाह्य मुलांच्या या शोधमोहिमेत नववीमध्ये नापास झाल्याने शाळाच सोडून देणारे १३६ मुले आढळून आली. अशा मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा कशाप्रकारे आणता येईल यादृष्टीने शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी अशा मुलांसाठी शाळाच भरविण्याचा विचार पुढे आणला. सदर मुलांसाठी जवळच्या मनपा शाळांमध्ये रोज सायंकाळी ४ ते ७ या वेळेत वर्ग भरविण्यात येईल. या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी सेवाभावी, सेवानिवृत्त शिक्षकांना आवाहन केले जाईल. त्यांच्यामार्फत मुलांची पुन्हा शाळा भरविण्यात येईल. सदर मुलांची दहावीची तयारी करून घेतल्यानंतर १७ नंबरचा फार्म भरत त्यांना दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट करण्यात येईल. दहावी उत्तीर्ण झाल्यास या मुलांना पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त व प्रोत्साहित केले जाईल. (प्रतिनिधी)