निमाच्या इतिहासाला कलाटणी देणारी निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:53 AM2018-07-25T00:53:26+5:302018-07-25T00:53:42+5:30
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या निवडणुकीत पुन्हा एकदा गटबाजी उफाळून आली आहे. सत्ताधारी एकता पॅनलच्या विरोधात उद्योग विकास पॅनलने निवडणूक लढविण्याचा निर्णय आठ दिवसांपूर्वीच घेतला होता. त्यामुळे एकता पॅनल एकसंघ राहील की नाही? याविषयी शंकेची पाल चुकचुकत असताना पडायची ती ठिणगी पडली आणि पॅनल दुभंगले गेले. आता या फुटीचे खापर फोडण्यासाठी आरोपांचा धो-धो पाऊस नक्कीच पडणार आहे.
नाशिक : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या निवडणुकीत पुन्हा एकदा गटबाजी उफाळून आली आहे. सत्ताधारी एकता पॅनलच्या विरोधात उद्योग विकास पॅनलने निवडणूक लढविण्याचा निर्णय आठ दिवसांपूर्वीच घेतला होता. त्यामुळे एकता पॅनल एकसंघ राहील की नाही? याविषयी शंकेची पाल चुकचुकत असताना पडायची ती ठिणगी पडली आणि पॅनल दुभंगले गेले. आता या फुटीचे खापर फोडण्यासाठी आरोपांचा धो-धो पाऊस नक्कीच पडणार आहे. जिल्ह्यातील अग्रगण्य निमा या औद्योगिक संघटनेची द्वैवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत आयमा निवडणुकीचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळेच उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच सत्ताधारी एकता पॅनलच्या विरोधात आयमा निवडणुकीतील तुषार चव्हाण गटाने उद्योग विकास पॅनल तयार केले आणि सत्ताधारी गोटात काहीशी अस्थिरता आली. त्यामुळे एकता पॅनलमध्ये फूट पडणार नाही याची दक्षता घेत शेवटच्या क्षणापर्यंत अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. तरीही जे व्हायचे तेच झाले. ठराविक जागेसाठी पॅनलच्या नेत्यांचे एकमत होऊ शकले नसल्याने माघारीच्या दिवशी एकतामध्ये फूट पडली आणि एकताविरुद्ध एकता असे दोन गट तयार झाले.
खरे तर एकतेच्या अस्थिरते मागे कोणतीही हतबलता नक्कीच नसली तरी महत्त्वाकांक्षा एकतेपेक्षा महत्त्वाची ठरली आणि रणनिती मागे पडल्याने फुटीची बीजे अधिक घट्ट रुजली गेली. अंतर्गत विषयाला चव्हाट्यावर चर्चेला वाव मिळाल्यामुळे उरलेसुरले इलाजही खुंटले आणि जी भीती काहीशी वाटत होती तीच अखेर खरी ठरली आणि निमाच्या इतिहासाला कलाटणी मिळाली. एकतामध्ये समेटासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून एक दिवसाची मुदत वाढवून घेण्यात आली होती. समेटाची जबाबदारी सुनील बागुल यांच्यावर सोपविण्यात आली होती. दिवसभर चर्चेच्या फेरीतून काहीही निष्पन्न निघाले नाही. दोन्ही गटांचे नेते माघार घेण्यास तयार होत नसल्याने बागुल यांनाच चर्चेतून माघार घ्यावी लागली. निमाच्या घटनेनुसार पहिल्या वर्षीचे अध्यक्षपद हे मोठ्या उद्योगासाठी राखीव असून, लघुउद्योगासाठी राखीव असलेल्या उपाध्यक्षास पहिल्या वर्षीचे अध्यक्षपद मिळत असते. त्यामुळे निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी रस्सीखेच निर्माण होत असते. या निवडणुकीतदेखील तेच घडले. सत्ताधारी एकता पॅनलकडे उपाध्यक्षपदासाठी विद्यमान उपाध्यक्ष उदय खरोटे, सिन्नरचे विद्यमान अतिरिक्त उपाध्यक्ष आशिष नहार, विद्यमान सचिव ज्ञानेश्वर गोपाळे, विद्यमान सरचिटणीस श्रीकांत बच्छाव या चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यात बच्छाव आणि गोपाळे यांनी माघार घेतल्यानंतर नहार आणि खरोटे या दोन उमेदवारांची नावे त्यांच्या नेत्यांनी लावून धरले, तर अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी आणि के. एल. राठी यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. या दोनही उमेदवारांसाठीदेखील तीच परिस्थिती निर्माण झाल्याने एकतामध्ये बेबनाव निर्माण झाला आणि ऐनवेळी एकताचे दोन पडले.
निमाच्या मागील तीन निवडणुकांपासून (२०१२ पासून) निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांना रोखण्याचा प्रयत्न सत्ताधारी एकता गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे बेळे यांना थोडे लांब रहावे लागले होते. नुकत्याच झालेल्या आयमा निवडणुकीत तुषार चव्हाण यांच्या विरोधात एकता पॅनलने बेळे यांची मदत घेतल्याने निमा निवडणुकीत बेळे सक्रिय झाले आहेत. एकताच्या श्रेष्ठींच्या बैठकीत बेळे यांनी अध्यक्ष पदाचे उमेदवार के. एल. राठी आणि उपाध्यक्ष आशिष नहार यांच्या उमेदवारीवर हक्क सांगितला. यात के. एल. राठी यांच्यामुळेच बेळे यांना दुसºयांदा (२०१२-२०१३) अध्यक्षपद मिळाले असल्याने राठी यांना अध्यक्षपदी निवडून आणण्यासाठी बेळे यांनी कंबर कसली असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळेच तिसरे पॅनेल निवडणूक रिंगणात उतरले आहे.