ग्रामपंचायतीसाठी आजपासून नामनिर्देशनपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:12 AM2020-12-23T04:12:16+5:302020-12-23T04:12:16+5:30
नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवार (दि. २३) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. येत्या ३० ...
नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवार (दि. २३) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. येत्या ३० तारखेपर्यंत इच्छुकांना ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
डिसेंबरमध्ये मुदत संपुष्टात आलेल्या जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, शासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर गेल्या १५ तारखेला तहसीलदारांनी तालुकापातळीवर निवडणुकीची नोटीस प्रकाशित केली होती. त्यानुसार दि. २३ पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. उमेदवारांना सार्वजनिक सुटी वगळून ३० तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. तथापि अर्ज ऑनलाइन भरावयाचे असल्याने अर्जांची पिंटआऊट सार्वजनिक सुटी वगळून निवडणूक निरीक्षक कार्यालयाला सादर करावी लागणार आहे.
जिल्ह्यातील नाशिक, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, इगतपुरी, निफाड, सिन्नर, येवला, मालेगाव, नांदगाव, चांदवड, कळवण, बागलाण आणि देवळा या तालुक्यातील एकूण ६२१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून, ५६०४ जागांसाठी उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका या शक्यतो बिनविरोध करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नसल्याने निवडणुकीची धामधूम टाळण्याकडे स्थानिक नेतृत्वाचा कल असल्याचेही दिसते.
दि. २३ ते ३० या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी देण्यात आला आहे.
३१ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून, ४ जानेवारीला अर्ज माघारी घेता येणार आहे. याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांना चिन्हे वाटप व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान तर १८ रोजी मतमोजणी होणार आहे.
-
==इन्फो--
मुदत संपलेल्या ग्रामपंचायती
तालुका ग्रामपंचायतींची संख्या
नाशिक २५
त्र्यंबक ०३
दिंडोरी ६०
इगतपुरी ०८
निफाड ६५
सिन्नर १००
येवला ६९
मालेगाव ९९
नांदगाव ५९
चांदवड ५३
कळवण २९
बागलाण ४०
देवळा ११
एकूण ६२१