नाशिकच्या नमिता कोहोक ठरल्या ग्लोबल युनायटेड लाइफटाइम क्वीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 02:41 PM2018-08-02T14:41:46+5:302018-08-02T15:26:45+5:30
कौतुकाची थाप: कामाची दखल घेत ५१ देशांमधून मिळाले नामांकन
नाशिक-येथील डॉ. नमिता कोहोक यांना नुकत्याच अमेरिकेत झालेल्या ग्लोबल युनायटेड पिजंट स्पर्धेत ग्लोबल युनायटेड लाइफटाइम क्वीन हे नामांकन मिळाले आहे. यानिमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा अमेरिकेत नाशिकचे आणि देशाचे नाव उज्वल केले आहे. अमेरिकेतील मिनीसोटा, मिनेपॉलीस येथे ही स्पर्धा पार पडली. डॉ. कोहोक यावर्षी ५१ देशांमधुन नामांकन मिळवून लाइफटाइम क्वीन बनल्या आहेत.
ग्लोबल युनायटेड पिजंट ही स्पर्धा एका आगळ्यावेगळ्या कारणासाठी जगप्रसिद्ध आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या जगभरातील सौंदर्यवती या स्वत: कॅन्सरवर मात केलेल्या असतात व कॅन्सर जनजागृतीचे काम करतात. मागील वर्षी त्यांची मिसेस ग्लोबल युनायटेड २०१७ म्हणून निवड झाली होती. त्यांच्या रुपाने भारतात पहिल्यांदाच हा सन्मान आला. ब्राझील, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, मलेशिया, अमेरिका अशा देशांमधुन त्यांची निवड झाली. मागील एक वर्षाच्या कालावधीत त्यांनी कॅन्सरच्या जनजागृतीसाठी व कॅन्सरग्रस्त मुलांसाठी निधी जमा करतानाच गरजू मुलींच्या शिक्षणासाठी काम केले. वृद्धाश्रमात सकारात्मक जीवनावर काम करताना त्या स्वत: कॅन्सरवर मात करुन पुढे आल्या आहेत. या कामाची नोंद ५१ देशात होत होती. या किताबामुळे त्या आयुष्यभर या स्पर्धेच्या अविभाज्य घटक बनल्या आहेत. लाइफटाइम क्वीन हा किताब दिर्घकालीन कामानंतर मिळतो. पण तो डॉ. नमिता यांनी दुसºयाच वर्षी मिळवला असून त्यांच्या कामाची पावती म्हणून तो त्यांना ५१ देशांमधून मिळालेल्या पसंतीनुसार जाहिर करण्यात आलाआहे.
हॅटट्रिक
डॉ. नमिता कोहोक यांनी या स्पर्धेतील विजयाद्वारे हॅटट्रिक साधली आहे. २०१५ मध्ये हॉँगकॉँग येथे झालेल्या मिसेस इंटरनॅशनल वर्ल्डवाइड आणि मिसेस इंडिया फोटोजेनिकच्या मानकरी ठरल्या. २०१७ मध्ये अमेरिकेत झालेल्या स्पर्धेत त्या मिसेस ग्लोबल युनायटेड पदाच्या मानकरी ठरल्या. आता २०१८ मध्ये त्या लाइफटाइम क्वीन मिसेस ग्लोबल युनायटेडच्या मानकरी ठरल्या. तीनदा या स्पर्धेत त्यांनी आपल्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटवला आहे.
हा किताब मला देण्यात येत असल्याचे स्पर्धेस्थळी अचानक जाहिर करण्यात आले. मला आधी त्याची काहीच कल्पना नव्हती. खरतर मी मागील वर्षीचा ‘मिसेस ग्लोबल युनायटेड’ किताब यंदाच्या विजेतीला सुपुर्द करण्यासाठी गेले होते. पण मी मागील वर्षी केलेल्या कामांची दखल घेत हा सन्मान मला बहाल करण्यात आला. आता दरवर्षी जुलै मध्ये होणाºया या स्पर्धेत मला सहभागी होता येणार आहे. त्याचे मला निमंत्रण असेल.याशिवाय या स्पर्धेसाठी भारताची संचालक म्हणून माझ्यावर नविन जबाबदारी आली आहे. मी आता भारतातुन स्पर्धक नेऊ शकणार आहे. आजपर्यंत ११ ते १२ जणींना लाइफटाइम क्वीनचा किताब मिळाला आहे.
- डॉ. नमिता कोहोक, ग्लोबल युनायटेड लाइफटाइम क्वीन