निफाडमध्ये नालेसफाईची कामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:12 AM2021-05-30T04:12:10+5:302021-05-30T04:12:10+5:30
निफाड : पावसाळ्यात धोकादायक परिस्थिती उद्भवू नये, यासाठी नगरपंचायतीच्या ...
निफाड : पावसाळ्यात धोकादायक परिस्थिती उद्भवू नये, यासाठी नगरपंचायतीच्या वतीने निफाड शहरात करावयाची नालेसफाईची कामे सुरू करण्यात आली असून, पावसाळ्यात काही परिस्थिती उद्भवल्यास आपत्कालीन व्यवस्था परिपूर्ण करण्यात आली आहे.
निफाड नगरपंचायतीला पावसाळापूर्व कामासाठी निधी येत नसतो. त्यामुळे नगरपंचायतीच्या वार्षिक अर्थसंकल्पात तीन ते चार लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीतून ही कामे मार्गी लावली जातात. यंदाच्या पावसाळ्यात शहरात काही परिस्थिती उद्भवू नये, यासाठी तीन आठवड्यांपासून या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. गटारी साफ करणे, ज्या ठिकाणी पाणी तुंबू शकते अशा भागातील नाले साफ करणे, आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे करण्यासाठी नऊ सफाई कामगारांचे पथक नेमण्यात आले. शहरात ज्या ठिकाणी बांधकाम झाल्यानंतर उरलेले बांधकाम साहित्य पडलेले आहे, ते उचलण्याचे काम सुरू आहे.
-------------
धोकादायक घरांना नोटिसा
शहरातील बहुतेक भागांत भूमिगत गटारी बांधण्यात आलेल्या आहेत. ज्या २० ते २५ धोकादायक असणाऱ्या इमारती आहेत. अशा इमारतींच्या मालकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, शिवाय पंचनामे करण्यात आले आहेत. पावसाळ्यात पूर परिस्थिती उद्भवल्यास त्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी पथके नेमण्यात आले आहेत. शिवाय नगरपंचायत येथे आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात येऊन यासाठी २४ तास एक कर्मचारी या कक्षात थांबणार आहे. हा कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीत उद्भवलेल्या घटनेबाबत आलेला फोन घेणे, त्याची माहिती तातडीने आपत्कालीन पथकांना देणे, त्यानंतर ही पथके घटनेच्या ठिकाणी मदत कार्य सुरू करतील, याचे सर्व नियोजन तयार झाले आहे.
---------------------
निफाड शहरात पावसाळ्यात अतिपावसाने धोकादायक परिस्थिती उद्भवू नये, यासाठी तीन आठवड्यांपूर्वीच नाले, गटारीच्या सफाईच्या कामांना सुरुवात केली आहे. पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपाययोजना करण्यासाठी आपत्कालीन पथके स्थापन करून त्या सर्वांवर जबाबदारी निश्चित केली आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे.
-डॉ. श्रीया देवचके, मुख्याधिकारी, निफाड