पोलीस कोठडीत संदीप वाजेचे असहकार्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 01:23 AM2022-02-10T01:23:14+5:302022-02-10T01:23:34+5:30
मनपाच्या वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजे हत्याकांडात मुख्य संशयित म्हणून पोलिसांनी अटक केलेला त्यांचा पती संदीप वाजे याच्याकडून अद्यापही पोलिसांना फारसे सहकार्य केले जात नसल्याने पोलिसांचा तपास पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण पोलिसांनी बुधवारी (दि.९) वाजेच्या दोन मित्रांना पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांचीही कसून चौकशी सुरू आहे. यापैकी एक संशयित हा सुवर्णा वाजे हत्याकांडातील संशयित साथीदार निष्पन्न होऊ शकतो, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
नाशिक : मनपाच्या वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजे हत्याकांडात मुख्य संशयित म्हणून पोलिसांनी अटक केलेला त्यांचा पती संदीप वाजे याच्याकडून अद्यापही पोलिसांना फारसे सहकार्य केले जात नसल्याने पोलिसांचा तपास पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण पोलिसांनी बुधवारी (दि.९) वाजेच्या दोन मित्रांना पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांचीही कसून चौकशी सुरू आहे. यापैकी एक संशयित हा सुवर्णा वाजे हत्याकांडातील संशयित साथीदार निष्पन्न होऊ शकतो, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
पंधरवड्यापूर्वी २५ जानेवारी रोजी मध्यरात्री डॉ. सुवर्णा वाजे यांची मोटार जळीत अवस्थेत शहराबाहेर पोलिसांना आढळून आली होती. या मोटारीत मिळालेल्या हाडांमुळे पोलिसांनी तपासाला गती दिली. हाडांचा डीएनए वाजेंच्या कुटुंबातील व्यक्तींसोबत जुळल्यामुळे वाजे खून प्रकरणाचा पर्दाफाश झाला. वाजे मर्डर मिस्ट्री हळूहळू उलगडत आहे. वाजेंच्या माहेरच्या लोकांनी दिलेल्या जाब-जबाबावरून पोलिसांनी संशयित संदीप वाजे यास अटक केली आहे. वाजे याच्याकडून पोलीस कोठडीत पोलिसांना चौकशीमध्ये फारसे सहकार्य केले जात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी त्याच्या संपर्कात असलेल्या संशयितांची चौकशी सुरू केली आहे. बुधवारी पुन्हा दोघा मित्रांना पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतले. यापैकी एकावर पोलिसांना दाट संशय असून, त्याचा कटात सहभाग असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले. येत्या दोन दिवसांमध्ये त्याच्या सहभागाविषयी काही पुरावे हाती येतील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी (दि.११) संदीप वाजे यास पोलिसांकडून इगतपुरी तालुका न्यायालयात हजर केले जाणार आहे.
---इन्फो--
‘फॉरेन्सिक’चा अहवाल आज येणार
वाजे याचा जप्त केलेल्या मोबाइलसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे पडताळणीसाठी फॉरेन्सिककडे मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल ग्रामीण पोलिसांना गुरुवारी (दि.१०) मिळण्याची अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे. यासाठी बुधवारी पुन्हा पडताळणी करणाऱ्या फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्यांशी पोलिसांनी संपर्क साधला आहे.
--इन्फो--
३० साक्षीदारांचे जाबजबाब
पोलिसांनी वाजे खून प्रकरणाशी संबंधित एक दोन नव्हे, तर तब्बल ३० साक्षीदारांचे जाबजबाब तपासले आहेत, तसेच आठ ते दहा संशयितांची अद्याप चौकशी केली आहे. यापैकी दोघांना पोलिसांनी बुधवारी पुन्हा चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे. साक्षीदारांच्या जबाबावरून पोलिसांनी पुढे तपासाला गती देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.