सिन्नर तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींंमध्ये पोटनिवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 05:13 PM2019-11-27T17:13:24+5:302019-11-27T17:14:16+5:30
सिन्नर : तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींच्या ८ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वच ठिकाणी प्रत्येकी एक सदस्याची बिनविरोध निवड झाली. बहुतेक ठिकाणी प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाले होते. २५ डिसेंबर रोजी माघारीची मुदत होती, मात्र त्या अगोदरच या निवडी बिनविरोध पार पडल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
पाथरे खुर्द ग्रामपंचायतीत प्रभाग क्र. दोन मध्ये सर्व साधारण महिला जागेवर वैशाली जाधव यांची बिनविरोध निवड झाली. फुलेनगरच्या प्रभाग क्र. तीन मधील सर्वसाधारण जागेवर रामदास गाडेकर, पिंपरवाडीच्या प्रभाग क्र. दोन मधील सर्वसाधारण जागेवर प्रवीण गायकवाड, सोमठाणे येथील प्रभाग क्र . तीन मधील अनुसुचित जातीच्या महिला जागेवर सरला साळवे, लोणारवाडी येथील प्रभाग क्र . एक मधील सर्वसाधारण जागेवर राजेंद्र भगत, पंचाळे येथील प्रभाग क्र. चार मधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागेवर सुरज तुपे, खोपडी बुद्रुक येथील प्रभाग क्र . तीन मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागेवर कावेरी गुरु ळे तर दोडी बुद्रुक येथील प्रभाग क्र. एक मधील अनुसुचित जमातीच्या जागेवर सोमनाथ माळी यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान या सर्व ठिकाणची निवडणूक बिनविरोध झाली असून त्यांची अधिकृत घोषणा दि. ८ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. यातील बहुतेक ग्रामपंचायतींची मुदत जून २०२० मध्ये संपत असून केवळ ६ ते ७ महिन्यांचा कालावधी सदस्यांना मिळणार असल्याने पोटनिवडणुकीत चुरस दिसली नाही. दरम्यान निवडणुका बिनविरोध झाल्याने शासनाचा खर्चही वाचला आहे.