चतुर्थश्रेणीतील पदे रद्दच्या निर्णयाविरोधात शिक्षकेतरांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:31 AM2020-12-15T04:31:15+5:302020-12-15T04:31:15+5:30
नाशिक : राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने ११ डिसेंबरला जाहीर केलेल्या शासन निर्णयाच्या माध्यमातून चतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे संपुष्टात आणण्याचा ...
नाशिक : राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने ११ डिसेंबरला जाहीर केलेल्या शासन निर्णयाच्या माध्यमातून चतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे संपुष्टात आणण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप करीत माध्यमिक खासगी शाळा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करीत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात चतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांनीही सहभाग नोंदवत शिक्षण विभागाच्या निर्णयाविरोधात निषेध नोंदविला. शासनाचा हा निर्णय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक ठरणारा असल्याने सरकारने तो तत्काळ रद्द करावा, अशी मागणीही संघटनेतर्फे जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना सोमवारी (दि. १४) दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशत:, पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतिबंध तयार करण्यासंदर्भात ११ डिसेंबरला शासन निर्णय जाहीर केला. यासंदर्भात समिती नेमून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. परंतु, कोणतीही समिती स्थापन करण्यात आली नाही. तसेच चतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांनाही विचारात न घेता आकृतिबंध हटविण्याऐवजी ‘प्रतिशाळा शिपाई भत्ता’ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शिपाई, नाईक, पहारेकरी, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर आदी चतुर्थश्रेणी कर्मचारी पदांवर कार्यरत असणारे कर्मचारी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर ही पदे संपुष्टात येतील. तसेच यापुढे या पदांच्या भरतीऐवजी ‘शिपाई भत्ता’ लागू राहील. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माध्यमिक खासगी शाळा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनांमध्ये प्रचंड संताप असून, शासनाच्या या निर्णयाविरोधात सर्व संघटनांनी एकत्रित राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून सरकारला दिला आहे. यावेळी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह आर. डी. निकम, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ गुलाब भामरे, टी.डी.एफ.चे सरचिटणीस नीलेश ठाकूर, के. एल. चव्हाण, के. के. अहिरे, बाळासाहेब सोनवणे, संग्राम करंजकर,त्र्यंबक मार्तंड, प्रदीपसिंह पाटील आदी उपस्थितीत होते.
(आरफोटो- १४ टिचक एजिटेशन) माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी अनिल शहारे यांना निवेदन देताना नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह आर. डी. निकम यांच्यासह गुलाब भामरे, के. एल. चव्हाण, के. के. अहिरे, बाळासाहेब सोनवणे, संग्राम करंजकर, नीलेश ठाकूर, त्र्यंबक मार्तंड, प्रदीपसिंह पाटील आदी.(आरफोटो- १४ टिचक एजिटेशन) माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी अनिल शहारे यांना निवेदन देताना नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह आर. डी. निकम यांच्यासह गुलाब भामरे, के. एल. चव्हाण, के. के. अहिरे, बाळासाहेब सोनवणे, संग्राम करंजकर, नीलेश ठाकूर, त्र्यंबक मार्तंड, प्रदीपसिंह पाटील आदी.