भाज्या महागल्याने सर्वसामान्य हवालदिल
By Admin | Published: June 23, 2017 12:28 AM2017-06-23T00:28:14+5:302017-06-23T00:28:23+5:30
नाशिक : जून महिना संपत आला असून, दडून बसलेल्या पावसामुळे भाज्यांचा पुरवठा कमी झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जून महिना संपत आला असून, दडून बसलेल्या पावसामुळे भाज्यांचा पुरवठा कमी झाला असून, भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. मुबलक भाज्या बाजारात कधी दाखल होतील व दर आवाक्यात कधी येतील, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. भाज्यांच्या भावात दुपटी-तिपटीने वाढ झाल्याचे दिसते आहे. भाजीविक्रेते आणि सर्वसामान्य ग्राहक यांना भाववाढीचा सामना करावा लागत असून, भाव कमी झाले नाही तर परिस्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत.
जूनच्या पहिल्या पंधरवड्यात शेतकरी आंदोलन, त्याच दरम्यान झालेल्या तुरळक पावसामुळे भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात चढउतार झाले होते.आंदोलन संपल्यानंतर पुरेसा माल बाजारपेठेत दाखल होईपर्यंत भाज्यांचे भाव स्थिर व्हायला थोडा वेळ लागला. आता शेतकरी, व्यापारी, नागरिक साऱ्यांनाच दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. हवा तसा पाऊस पडत नसल्याने शेतातील उभी पिके वाळू लागली आहेत तर दुसरीकडे मधुनच एखाद दिवस धुवाधार पाऊस होत असल्याने काढलेल्या भाज्या सडून नुकसान सहन करावे लागत आहे. दमदार पाऊस पडल्यानंतर भाज्यांचे भाव स्थिर होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.