सप्तशृंगगडावर सर्रास अवैध दारुविक्री
By admin | Published: March 3, 2016 11:05 PM2016-03-03T23:05:00+5:302016-03-03T23:05:20+5:30
सप्तशृंगगडावर सर्रास अवैध दारुविक्री
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या तसेच पर्यटन स्थळ समजल्या जाणाऱ्या सप्तशृंगगडावरील अवैध दारुची सर्रास विक्री सुरु असल्याने येथील तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात आले आहे.
सप्तशृंग येथे बाराही महिने भाविकांची व परदेशातून येणाऱ्या पर्यटकांची वर्दळ असते देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या या पवित्र ठिकाणी बऱ्याच दिवसांपासून दारुविक्रीचा सुळसुळाट सुरु आहे. त्यामुळे येणाऱ्यांना बऱ्याचवेळा मद्यपींचेही दर्शन होते. काहींकडून भाविकांना त्रास देखील सहन करावा लागतो.
गेल्या चार वर्षांपुर्वी महिला बचत बचत गटाने अवैध दारुविक्री बंद होण्यासाठी प्रयत्न केले होते. दारुधंद्याचा मुळापासून नायनाट व्हावा यासाठी बचत गटाच्या महिला पुढे सरसावल्या होत्या दारुमुळे आदिवासी महिलांचे संसारही उद्धवस्त झाले आहेत.
याविषयी महिला वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. परंतु त्याच्या मोहिमेला पोलिसांनी सहकार्य केले नाही. असा आरोप बचत गटाच्या महिला करीत आहेत.
पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या धंद्याला सुगीचे दिवस आले आहेत.
पोलिस चौकी हाकेच्या अंतरावर असतांनाही राजरोसपणे दारुअड्डे बिनदिक्कीपणे सुरु आहे. त्यामुळे तरुण वर्गावर याचा परिणाम होऊ लागला आहे.(वार्ताहर)