खासगी सावकारीच्या पाशात गुरफटले सर्वसामान्य मालेगावकर
By admin | Published: January 17, 2016 09:58 PM2016-01-17T21:58:02+5:302016-01-17T21:59:24+5:30
खासगी सावकारीच्या पाशात गुरफटले सर्वसामान्य मालेगावकर
मालेगाव : शहरात मोठ्या प्रमाणावर खासगी पातळीवर व्याजाने पैसे देण्याचा गोरख धंदा केला जात असून, या खासगी सावकारीने शहरातील अनेकजण रस्त्यावर आल्याची चर्चा रंगली आहे. पोलिसांनी अशा सावकारांना पायबंद घालावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शासनाने बँकांना कर्ज देण्याचे बंधन घातले असले तरी जवळपास सर्वच बँकांमध्ये वशिला असलेल्यांना किंवा ओळखीच्या नागरिकांना कर्ज दिले जात असून, सर्वसामान्यांना कर्ज दिले जात नाही. त्यामुळे हा व्यवसाय फोफावला आहे. याउलट हे खासगी सावकार मालमत्तेच्या तारणावर सहज पैसे देतात. त्यामुळे अडलेल्यांना नाईलाजाने यांचा आसरा घ्यावा लागत आहे. यात काहीजण अडलेल्या मदत म्हणून हा व्यवसाय करत असले तरी काहीजण समोरच्याची मालमत्ता लाटण्याच्या उद्देशाने हा धंदा करत असल्याचे बोलले जाते. या व्यवसायात सध्या महिन्याला १५ ते २० टक्के दराने व्याजाने पैसै वाटले जात असल्याची माहिती आहे.
यात काहीजण दिवसभरात पैशाची नड असलेल्यांचा शोध घेतात. मदत करण्याच्या बहाण्याने त्याच्याशी जवळीक साधत त्याला व्याजाने पैसे देणाऱ्यांशी गाठी-भेटी घालून देतात व त्याला पैसे घेण्यास भरीस पाडण्याचे काम ही काहीजण करतात. एकदा का त्याने पैसे घेतले की त्याला पूर्णपणे धुळीस मिळविण्याचे प्रकार केले जात आहे. या बदल्यात नाममात्र पैशावर अवाच्या सव्वा व्याज लावून तीन ते चार पटीने वसुली केली जात आहे.
या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर दादागिरी केली जात असून, मुद्दल व व्याजापोटी घरातील चिजवस्तू, वहाने, टीव्ही आदिंसारख्या मौल्यवान वस्तू उचलून नेण्याबरोबरच घरादारावर गंडांतर आणले जात आहे. काहीजण पैसै घेणाऱ्याने व्याजासह पैसे दिले तरी तारण म्हणून दिलेली मालमत्ता हडप करत असल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे. या विरोधात तक्रार करणारा मारहाणीच्या व जीविताच्या भीतीने पोलिसांत तक्रार करत नाही. एवढे होऊनही एखाद्याने तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा विविध मार्गांनी छळ करत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे तक्रार करण्यापेक्षा स्वत:च्या नशिबाला दोष देत बसावे लागते. या खासगी सावकारीमुळे काहींनी आत्महत्त्या केल्याची चर्चा आहे. पोलिसांनी असा व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)