...नाही सहन होत या व्यथा!
By admin | Published: June 2, 2017 01:50 AM2017-06-02T01:50:32+5:302017-06-02T01:50:41+5:30
शेतकऱ्यांच्या छायाचित्रांच्या माध्यमातून गुरुवारी दिवसभर सोशल मीडिया गहिवरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ‘काळ्या आईच्या उदरात पेरलंय बान-बियानं अन् निसर्गाकडे लागलंय बाचं मन... पावसाचं करतोय ध्यान, आता सारी कोरडीच माती नाही, दिसत बियांचं मोड, नाही दिसत हिरवं शिवार, शेत पडलं ओसाड... किती सांगू शेतकरी बाबाच्या कथा, नाही सहन होत या व्यथा...’ अशा एक ना अनेक प्रकारच्या कविता, शायरी, शेतकऱ्यांच्या छायाचित्रांच्या माध्यमातून गुरुवारी दिवसभर सोशल मीडिया गहिवरला.
देशाच्या अन् राज्याच्या इतिहासात प्रथमच बळीराजाने संप पुकारल्यामुळे शहरवासीयांचे हाल झाले आणि सरकारी यंत्रणाही हादरून गेली. या संपाबाबत अनेकांनी आपली मते सोशल मीडियावर मुक्तपणे मांडली. काहींनी शेतकऱ्यांचा संप गरजेचा होता, सरकारने अंत बघितला अन् संयमांचा बांध अखेर फुटला, अशा प्रतिक्रिया नोंदविल्या तर काहींनी मात्र शेतकऱ्यांनी संप केला यास हरकत नाही, मात्र शेतमालाची केलेली नासाडी बघवत नसल्याचेही अधोरेखित केले. गुरुवारी मध्यरात्रीपासून सोशल मीडियावर नेटिझन्स सक्रिय झाले होते. दिवसभर नेटिझन्सनी शहरासह जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या संपाबाबतच्या बातम्या, छायाचित्रे, चित्रफित सोशल मीडियावर पोस्ट केले. अनेकांनी बळीराजाचे व जनतेचे आभारही मानले. तसेच विविध ग्रुपवर शेतकऱ्यांचे छायाचित्र पोस्ट केले जात होते. शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्याचा संदेशही यामध्ये लिहिण्यात आला होता. एकूणच दिवसभर सोशल मीडियावर शेतकरी संपाची चर्चा रंगली होती.