राममंदिर निवडणुकीचा नव्हे, अस्मितेचा मुद्दा
By admin | Published: January 17, 2016 11:13 PM2016-01-17T23:13:42+5:302016-01-17T23:14:13+5:30
सुब्रह्मण्यम स्वामी : वर्षअखेरीपर्यंत मंदिर उभारण्याचा दावा
नाशिक : अयोध्येत श्रीराममंदिराच्या उभारणीचा मुद्दा निवडणुकीचा नव्हे, तर हिंदूंच्या अस्मितेचा असून, या वर्षअखेरीपर्यंत मंदिराची उभारणी करूनच दाखवू, असा दावा माजी केंद्रीय कायदामंत्री व भाजपा नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला.
एका कार्यक्रमानिमित्त नाशिकला आलेल्या डॉ. स्वामी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राममंदिराचा
मुद्दा उचलला जात असल्याच्या
आरोपाचे त्यांनी खंडन केले. ते म्हणाले, या देशात कायम कोठे ना कोठे निवडणुका होत असतात. मग राममंदिर कधीच बनवायचे नाही का? मुळात अयोध्येत रामाचे मंदिर होते, हे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे. मंदिराच्या जागी शिया मुस्लिमांनी मशीद
बांधली होती. त्यांचे वंशज शरयू नदीच्या दुसऱ्या तीरावर मशीद बांधण्यास राजी आहेत. (पान ७ वर)
मग आता सुन्नी मुस्लीम या प्रकरणात का हस्तक्षेप करीत आहेत? मशीद ही केवळ मुस्लिमांची नमाजपठणाची जागा असून, ती हलवली जाऊ शकते. अन्य मुस्लीम देशांतही याला मान्यता असून, तसे पत्रच आम्ही सौदी अरेबियातून आणून ते सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार आहोत. वर्षभराच्या आत आम्ही तेथे राममंदिर बांधून दाखवू. मुस्लीम आक्रमकांनी देशातील चाळीस हजार मंदिरे तोडली असून, त्यांनी मथुरा, काशी व अयोध्या ही तीन मंदिरे तरी हिंदूंसाठी सोडावीत, या विधानाचाही त्यांनी पुनरुच्चार केला. यासंदर्भात आपण मुस्लीम नेत्यांना भेटणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, डॉ. स्वामी यांनी पाकिस्तानबाबत पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची पाठराखण केली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची अवस्था कठपुतलीसारखी असली, तरी पाकिस्तान हा संयुक्त राष्ट्राचा सदस्य असल्याने चर्चा सुरूच ठेवायला हवी. याशिवाय पर्रीकर यांचे ‘आम्हीही त्यांना वेदना देऊ’ हे विधानही योग्य असल्याचे ते म्हणाले, तर पर्यावरणप्रेमींचा विरोध झुगारून नदीजोड प्रकल्प पुढील पाच वर्षांत पूर्ण केला जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)
इन्फो :
आमीर खानवर आगपाखड
देशातील परिस्थितीबद्दल भीती व्यक्त करणाऱ्या पत्नी किरणवर आमीर खानने तेव्हाच रागवायला हवे होते. उलट त्याने याची जाहीर कार्यक्रमात वाच्यता केली. हे चुकीचे असल्याचे सांगत डॉ. स्वामी यांनी आमीर खानने ‘पीके’च्या प्रचारासाठी पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ची मदत घेतल्याच्या दाव्याचाही पुनरुच्चार केला. ‘पीके’च्या प्रचारासाठी त्याने दुबईत जाऊन हिंदूविरोधी मंडळींची भेट घेतली होती, असे ते म्हणाले.
फोटो : १७ पीएचजेए ७१