माझे फेसबुकवर अकाउंटसुद्धा नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 01:31 AM2019-06-25T01:31:54+5:302019-06-25T01:32:37+5:30
सोशल मीडियाचा फटका केवळ सर्वसामान्यांना बसतो असे नाही, तर चक्क आयपीएस अधिकारी नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनाही त्याला सामोरे जावे लागत आहे.
नाशिक : सोशल मीडियाचा फटका केवळ सर्वसामान्यांना बसतो असे नाही, तर चक्क आयपीएस अधिकारी नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनाही त्याला सामोरे जावे लागत आहे. फेसबुकवर त्यांच्या नावाने बनावट पेजेस तयार करून हजारो लाइकस् मिळविणाऱ्यांमुळे नांगरे-पाटील जेरीस आले आहे. नाशिकमध्ये आल्यापासून सायबर टीमला त्यांनी सूचना करून अद्याप असे १९ बनावट फेसबुक पेजेस त्यांनी डिलिट केले आहेत. फेसबुकवर माझ्या नावाचे अकाउंटदेखील नसल्याचा जाहीर खुलासा नांगरे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
तरुणांचे आयडॉल व आपल्या खास वक्तृत्व शैलीने तरुणाईची मने जिंकणारे विश्वास नांगरे पाटील यांचे फेसबुकवर स्वत:चे अकाउंट नसल्याचा धक्कादायक खुलासा दस्तुरखुद्द त्यांनी पत्रकार परिषदेतच केला. त्यांच्या नावाने फिरणाºया पोस्ट््स, व्हिडिओ हे बनावट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फेसबुकवर केवळ विश्वास नांगरे पाटील असे नाव जरी सर्च केले तरी आठ ते दहा पेजेस आणि ग्रुप दिसतात. त्यांच्या नावाने असलेले एक फेसबुक अकाउंट सहज तपासले असता त्यावर चक्क ६५ हजार ४२७ लोक त्यांना फॉलो करताना लक्षात आले. काही पेजेसला तर हजारोंच्या संख्येने लोक जोडलेले आहेत. काही दोन ते तीन फेसबुक पेजवर मात्र ‘हे पेज विश्वास सर चालवित नसून हे त्यांच्या चाहत्यांसाठी तयार करण्यात आले आहे’ अशी स्पष्ट सूचनाही वाचण्यास मिळते. त्यांच्या नावाने असलेल्या फेसबुक पेजवर किंवा अकाउंटवर भेट दिल्यास त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे छायाचित्रही सहजरीत्या झळकलेले पहावयास मिळतात.
प्रत्यक्षात असे असले तरी स्वत: विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबत ‘माझा फेसबुकशी कुठलाही संबंध नाही’ असे जाहीरपणे पत्रकारांसमोर सांगितले. यावरून त्यांच्या नावाने सोशल मीडियावर विशेषत: फेसबुकवर सुरू असलेली चर्चा ही ‘फेक’ असल्याचे स्पष्ट होते. त्यांच्या नावाने चालविल्या जाणाºया पोस्टदेखील त्यांच्या नसतात हेदेखील यावरून अधोरेखित होते. ‘अनेकदा माझी मुलगी मला सांगते, की पप्पा, तुमच्या नावाने फेसबुकवर पोस्ट आली आहे’ असे नांगरे-पाटील यांनी यावेळी सांगितले.
‘यू-ट्यूब’वरीलही काही चित्रफिती केल्या डिलिट
यू-ट्यूबवरदेखील काही चाहत्यांनी माझ्या भाषणाचे व्हिडिओ क्लिप्स् अपलोड केल्या आहेत; मात्र त्यापैकी बहुतांश क्लिप्स मी स्वत: सायबर टिमला डिलिट करण्याच्या सूचना केल्या आहेत. यू-ट्यूबवरदेखील माझे वैयक्तिक असे कुठलेही चॅनलवगैरे नसल्याचा खुलासा नांगरे पाटील यांनी केला.