व्हेंटिलेटर तर नाहीच, ऑक्सिजन बेड मिळणेही अशक्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:14 AM2021-04-16T04:14:14+5:302021-04-16T04:14:14+5:30
नाशिक : जिल्ह्यातील गंभीर कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर मिळणे तर जवळपास दुरपास्त झाले असून, शासकीय, मनपा किंवा खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन ...
नाशिक : जिल्ह्यातील गंभीर कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर मिळणे तर जवळपास दुरपास्त झाले असून, शासकीय, मनपा किंवा खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडही मिळेनासे झाले आहेत.
जिल्ह्यात रुग्णांना गत आठवड्यापासूनच ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, आता तर शासकीयच नव्हे, खासगी रुग्णालयांमध्येदेखील ऑक्सिजन बेड मिळणे जवळपास दुरपास्त झाले आहे. दिवसभरात शे-दीडशे फोन लावूनही एकाही ठिकाणी बेड रिक्त असल्याचा दिलासा कुणाकडूनही मिळत नाही. जोपर्यंत एखादा रुग्ण बरा होऊन घरी जात नाही किंवा कुणाचे निधन होत नाही तोपर्यंत त्या रुग्णालयातील बेड अन्य कुणाला मिळू शकत नाही, अशी परिस्थिती कायम आहे. रुग्णांना प्रचंड ओळखपाळख काढून किंवा रुग्णालयांच्या सर्व अटी मान्य करीत रुग्णाला दाखल करून घेण्यावाचून संबंधितांच्या कुटुंबीयांसमोर कोणताही मार्ग उरलेला नसल्याने रुग्ण आणि कुटुंबीय सर्व रुग्णालयांकडे अक्षरश: गयावया करीत ऑक्सिजन बेडची मागणी करीत आहेत.
इन्फो
रेमडेसिविरचा नाही पुरवठा
शासनाच्या अन्न-औषध विभागाकडून रेमडेसिविरच्या पुरवठ्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे थेट रुग्णालयांना त्यांच्या गरजेनुसार पुरवठा करण्यास बुधवारपासून प्रारंभ झाला होता. त्यानुसार बुधवारी जिल्ह्यातील १०१ कोविड मान्यताप्राप्त रुग्णालयांना ४,१५३ रेमडेसिविर इंजेक्शन्सचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र, गुरुवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील रुग्णालयांना पुरवठाच होऊ शकलेला नाही.
इन्फो
बेड संपल्याने काही रुग्णांना खुर्चीत ऑक्सिजन
जिल्हा रुग्णालयातील सर्व ऑक्सिजन बेड संपुष्टात येऊनही रुग्णांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे प्रशासनदेखील हतबल झाले आहे. अशा परिस्थितीत जिल्हा रुग्णालयातील काही रुग्णांना बेडऐवजी अखेरीस खुर्च्यांवर बसवून ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे एकीकडे रुग्णांचे हाल होत असल्याचे दिसत असले तरी ऑक्सिजन मिळाला नाही, तर त्यांना जीव गमवावा लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने काही रुग्णांना अशा प्रकारे ऑक्सिजन देण्याची वेळ जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनावर आली आहे.