‘अच्छे दिन’ नव्हे, दिवाळं काढलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:49 PM2017-10-17T23:49:46+5:302017-10-18T00:11:50+5:30
चार वर्षांपासून ‘वर्दी’ नाही, किमान वेतन नाही, राज्य कर्मचाºयाचा दर्जा नाही, वाहनांच्या दुरवस्थेमुळे सुरक्षा वाºयावर, बोनस नाही, महागाई भत्ता नाही... सांगा, आम्ही दिवाळी कशी साजरी करायची? ‘अच्छे दिन’ दाखविणाºयांनी आमचं दिवाळं काढलं, अशा उद्विग्न आणि संतापजनक भावना एसटी चालक-वाहकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
नाशिक : चार वर्षांपासून ‘वर्दी’ नाही, किमान वेतन नाही, राज्य कर्मचाºयाचा दर्जा नाही, वाहनांच्या दुरवस्थेमुळे सुरक्षा वाºयावर, बोनस नाही, महागाई भत्ता नाही... सांगा, आम्ही दिवाळी कशी साजरी करायची? ‘अच्छे दिन’ दाखविणाºयांनी आमचं दिवाळं काढलं, अशा उद्विग्न आणि संतापजनक भावना एसटी चालक-वाहकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. एसटी चालक-वाहक दररोज रस्त्यावर जीवन-मरणाचा खेळ खेळत एसटीला उत्पन्न मिळवून देत असले तरी या सरकारला त्यांच्या आर्थिक सुबत्तेविषयी कुठलेही सोयरसुतक नसल्याचे मत कर्मचाºयांनी व्यक्त केले. किमान वेतन कायद्यानुसार चालक-वाहकांना वेतनही दिले जात नाही. यामुळे चालक-वाहक कर्जबाजारी झाले असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा मोठा प्रश्न एसटी चालविणाºयांपुढे निर्माण झाला आहे. मात्र परिवहन प्रशासन व सरकार याबाबत अनभिज्ञ असल्याचे भासवत ‘कानावर हात’ ठेवून आहेत, यामुळे चालक-वाहकांवर राज्यव्यापी संप पुकारण्याची वेळ आली व या परिस्थितीला सरकार जबाबदार असल्याची प्रतिक्रिया चालक-वाहकांनी बोलून दाखविली.
आठ ते नऊ हजार रुपये दरमहा पगारात महामंडळाच्या अधिकाºयांनी कुटुंब चालवून दाखवावे. तुटपुंज्या वेतनामुळे चालक-वाहक कर्जबाजारी झाले. संपामुळे दिवाळीत प्रवाशांचे हाल झाले हे मान्य आहे; मात्र अच्छे दिन दाखविणाºयांना त्याची जाणीव नाही आणि आमच्या वेदनांची व सातत्याने होणारे हालही त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे करणार काय? संप होऊ न देण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवे होते. - पांडुरंग बडदे, चालक
३१ वर्षे महामंडळात वाहक म्हणून सेवा करीत आहे; मात्र कुटुंबासाठी काही कमविता आले नाही. तुटपुंज्या वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न आजही तितकाच गंभीर वाटतो. लोकांचे झालेले हाल मान्य आहे; मात्र त्यांच्या त्रासापेक्षा आमचे हाल कितीतरी पटीने अधिक आहेत. संप योग्य आहे. - जालिंदर दहिफळे, वाहक
सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे संपाची वेळ आली. सरकारने चालक-वाहकांसह राज्यातील जनतेला वेठीस धरले. सरकारची भूमिका या संपाला कारणीभूत ठरली. भाडेवाढ केली मात्र त्या भाडेवाढीनंतर चालक-वाहकांना काय मिळाले? सरकारने चालक-वाहकांचा विचार करावा. - पांडुरंग पवार, चालक