हिंदू धर्म नव्हे; भाजपचे नेते, पक्ष खतरेमें; संजय राऊतांचा टोला
By Suyog.joshi | Published: June 3, 2023 04:27 PM2023-06-03T16:27:33+5:302023-06-03T16:28:20+5:30
त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात केली आरती
त्र्यंबकेश्वर (नाशिक) : हिंदू धर्म खतरेमें असा होणारा प्रचार निखालस खोटा आहे. हिंदू धर्म नव्हे तर त्यांचेच नेते व पक्ष खतरेमें असल्याचा टोला ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला. त्र्यंबकेश्वर येथे काही लोकांनी धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला; परंतु, शांतताप्रिय गावकऱ्यांनीच त्यांचा डाव हाणून पाडला. एसआयटी नेमण्याइतपत एवढे वातावरण नव्हते, असेही राऊत यांनी त्र्यंबकेश्वर येथे मंदिराला भेट दिल्यानंतर माध्यमांसमोर सांगितले.
खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (दि. ३) त्र्यंबकेश्वरी त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन अभिषेक व पूजा-आरती केली. पूजेचे पौराेहित्य सचिन दीक्षित व सहकाऱ्यांनी केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, पक्ष अडचणीत आला की धार्मिक तणाव निर्माण करणे, धार्मिक वाद निर्माण करणे, अंधश्रद्धेला खतपाणी घालणे आदी प्रकारचा अवलंब केला जातो. प्रत्येक गावाच्या प्रथा-परंपरा असतात. संदल मिरवणूक जात असताना धूप दाखविण्याच्या प्रकारावर वाद झाला; परंतु, त्यावेळी मंदिर बंदच होते. पायरीवरून धूप दाखवला गेला. त्याने काय हिंदू धर्म भ्रष्ट झाला? हिंदू धर्म इतका कमजोर आहे की कमकुवत आहे? कुणीही येतो आणि आम्हाला हिंदू धर्म शिकवतो. हिंदू धर्म समजण्यासाठी अगोदर सावरकर, प्रबोधनकार ठाकरे वाचा, असा सल्लाही राऊत यांनी दिला.
त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ती पुनर्जिवीत करण्यासाठी गावकऱ्यांनी त्यासाठी लढा देणाऱ्या ललिता शिंदे यांना साथ द्यायला पाहिजे, असेही राऊत यांनी सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, वसंत गिते, विनायक पांडे, निर्मलाताई गावित, इगतपुरीचे निवृत्ती जाधव, तालुकाप्रमुख संपत चव्हाण, मनोहर मेढेपाटील, निवृत्ती लांबे, सचिन दीक्षित, कल्पेश कदम, नंदकुमार कदम, नितीन पवार, दीपक लोखंडे, पिंटू काळे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
सय्यद यांच्याशी गळाभेट
खासदार संजय राऊत यांची गुलाबशहावली बाबा दर्गाचे सलीम सय्यद यांनीही भेट घेतली. यावेळी राऊत यांनी सय्यद यांची माध्यमांसमोरच गळाभेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तत्पूर्वी, डाॅ. आंबेडकर चौकात ठाकरे शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीनेही सन्मान करण्यात आला.