महाबळेश्वर नव्हे, नाशिक ‘कुल सिटी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 01:19 AM2019-12-15T01:19:36+5:302019-12-15T01:21:06+5:30
थंड हवेचे ठिकाण म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही मागील दोन दिवसांपासून नाशिक ‘थंड’ झाले आहे. सातत्याने किमान तापमानाचा पारा घसरत असल्याने शनिवारीदेखील (दि.१४) नाशिकमध्ये राज्यात तापमानाची सर्वांत नीचांकी नोंद झाली. पहाटेपासून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहर दाट धुक्यात हरविलेले होते.
नाशिक : थंड हवेचे ठिकाण म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही मागील दोन दिवसांपासून नाशिक ‘थंड’ झाले आहे. सातत्याने किमान तापमानाचा पारा घसरत असल्याने शनिवारीदेखील (दि.१४) नाशिकमध्ये राज्यात तापमानाची सर्वांत नीचांकी नोंद झाली. पहाटेपासून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहर दाट धुक्यात हरविलेले होते.
मागील काही दिवसांपासून शहराच्या किमान तापमानात अचानकपणे घसरण होण्यास सुरुवात झाली आणि थंडीचा कडाकाहीवाढला. यामुळे नाशिककरांना बोचरी थंडी अनुभवयास येत आहे. यामुळे नाशिककरांनी उबदार कपड्यांचा वापर सुरू केला आहे. शहराचे वातावरण ‘कुल’ झाल्याने सकाळी जॉगर्सची संख्याही काही प्रमाणात रोडावल्याचे चित्र आहे. तसेच आजूबाजूला शेकोट्याही सकाळ-संध्याकाळ पेटलेल्या पहावयास मिळत आहे.
गोदाकाठावर राहणारा स्थलांतरित मजूरवर्ग गारठ्यापासून बचाव करण्यासाठी रात्रभर शेकोट्यांपासून ऊब मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. सकाळच्या वेळेस दैनंदिन कामकाज करणारे दूधविक्रेते, पेपरविके्रते, शालेय मुलांची वाहतूक करणारे वाहनचालक तसेच विद्यार्थी थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वत:चे ‘पॅकअप’ करूनच घराबाहेर पडत असल्याचे दृश्य मागील दोन दिवसांपासून पहावयास मिळत आहे. शनिवारी पहाटेपासून सकाळी ७.३० वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात दवबिंदूंचा वर्षाव झाला. तसेच दाट धुक्याची चादर शहरावर पसरल्याने रस्ते अदृश्य झाले होते. वाहनचालकांकडून सर्व दिवे सुरू करून वाहने रस्त्यावरून चालविली जात होती. साडेआठ वाजेच्या सुमारास सूर्यनारायणाचे काहीसे दर्शन नाशिककरांना घडले आणि धुक्याची दुलई हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली. सकाळी १० वाजेपर्यंत वातावरणात गारवा कायम होता. तसेच सायंकाळीदेखील वातावरण थंड झाले होते. रात्री थंडीचा कडाका पुन्हा जाणवू लागल्याने नाशिककरांनी उबदार कपड्यांचा आधार घेत पंखे, वातानुकूलित यंत्रांच्या वापरावर जणू स्वयंस्फूर्तीने बहिष्कार टाकणे पसंत केले.