नाशकात लॉकडाऊन नाहीच, पण कठोर निर्बंध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:14 AM2021-03-14T04:14:43+5:302021-03-14T04:14:43+5:30
नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी (दि.१२) उत्तर महाराष्ट्राचा दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा घेतला ...
नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी (दि.१२) उत्तर महाराष्ट्राचा दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा घेतला आणि बाधितांची संख्या वाढल्याने झाडाझडती घेतली होती. त्यामुळे आयुक्त कैलास जाधव यांनी शनिवारी (दि.१४) शासकीय सुट्टी असतानाही महापालिकेचे खाते प्रमुख आणि पोलीस अधिकाऱ्यांची तातडीने घेतली. त्यानंतर, त्यांनी पत्रकारांशी बेालताना माहिती दिली. शहरात कठोर निर्बंध असले, तरी लॉकडाऊनची शक्यता त्यांनी फेटाळली. मात्र, नागरिकांनी आरोग्य नियमांचे पालन करावे, यासाठी महापालिका पोलिसांच्या बरोबरीने रस्त्यावर उतरणार असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहेत.
सध्या शहरात जितके रुग्ण आहेत, त्यातील ३० टक्के रुग्णालयात असून, ७० टक्के रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. महापालिका आणि खासगी रुग्णालयातील आरक्षित केलेल्या ३,२८४ पैकी ३२७ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. अतिदक्षता विभागात ५१५ पैकी १०४ खाटा, ऑक्सिजनची व्यवस्था असणाऱ्या १,२८८ पैकी १९३ आणि व्हेंटिलेटरयुक्त २७१ पैकी ३० खाटांवर सध्या रुग्ण उपचार घेत आहेत. रिक्त खाटांची संख्या बऱ्यापैकी कमी असल्यामुळे मध्यंतरी बंद केलेली करोना काळजी केंद्र सुरू करण्याची गरज नसल्याचे पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी स्पष्ट केले.
शहरात असलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी ३० टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल असून, ७० टक्के रुग्ण घरीच गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. त्यामुळे तेथून ते बाहेर पडल्यास त्यांना सक्तीने रुग्णालयात दाखल करण्यात येईल. त्याचबरोबर, त्यांच्याव गुन्हे देखील दाखल करण्यात येणार आहे. बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात येणार असून, बाधितांच्या मोबाइल ॲपमध्ये एक ॲप टाकून त्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींच्या चाचणी करण्यात येणार आहेत.
संसर्ग टाळण्यासाठी शाळा आणि महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून, दहावी आणि बारावीचे वर्ग ठेवण्यासाठी पालकांची संमती घेऊन शाळा त्याबाबत निर्णय घेऊ शकतील, असे ते म्हणाले.
इन्फो...
महापालिकेचा ॲक्शन प्लॅन
कोरोनासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित
दोन स्वतंत्र हेल्पलाइन कार्यान्वित
आरोग्य पथके गठीत
गर्दी दिसली, तर कारवाई करणार
निर्बंधाचे नियमांचे पालन न करणाऱ्यांवर
व्यावसायिकांवर कारवाई इन्फो...
म्हणून नाशिकमध्ये प्रमाण वाढले...
कोरोना चाचणी केल्यानंतर त्यात शंभर चाचण्या केल्या, तर ४० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह येत असल्याने, देशपातळीवर झपाट्याने बाधितांच्या वाढणाऱ्या शहरांच्या यादीत नाशिकचा समावेश आहे. अर्थात, नाशिक महापालिकेच्या वतीने सरसकट कोरोना चाचण्या केल्या जात नाही. केवळ लक्षणे असलेल्यांच्या चाचण्या केल्या जातात. त्यामुळेही पॉझिटिव्हचे प्रमाण वाढले असल्याचे दिसते आहे, असे स्पष्टीकरण आयुक्त कैलास जाधव यांनी दिले.