नवीन रुग्णसंख्येत नाशिक राज्यातच नव्हे देशात अव्वल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:13 AM2021-04-18T04:13:35+5:302021-04-18T04:13:35+5:30
नाशिक : जिल्ह्यात नवीन रुग्ण दाखल होण्याच्या वेगात एप्रिलच्या प्रारंभापासून कमालीची वाढ झाली आहे. एका पाहणीनुसार दर दहा लाख ...
नाशिक : जिल्ह्यात नवीन रुग्ण दाखल होण्याच्या वेगात एप्रिलच्या प्रारंभापासून कमालीची वाढ झाली आहे. एका पाहणीनुसार दर दहा लाख लोकसंख्येमागे असलेल्या रुग्णसंख्येच्या निकषात नाशिकमधील रुग्णवाढीने गत महिनाभरात राजधानी मुंबईसह उपराजधानी नागपूर तसेच देशाची राजधानी दिल्लीलादेखील मागे टाकले आहे. या निकषानुसार नाशिकला गत महिन्यात प्रति दशलक्ष नागरिकांमागे ४६ हजार ५० रुग्ण बाधित तर महिनाभरात तब्बल ९७ हजार ७६५ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
या पाहणीनुसार देशातील अव्वल पाच बाधित रुग्णसंख्या वाढीमध्ये नाशिक जिल्हा हा सगळ्यात पुढे आहे. त्यात नाशिक पाठोपाठ नागपूर, पुणे, मुंबई आणि लखनौ या पाच शहरांचा क्रम आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार १६ मार्च ते १५ एप्रिल या महिनाभराच्या कालावधीत नागपूरला प्रति दशलक्ष नागरिकांमागे ४५ हजार ८५६ रुग्ण बाधित, पुण्याला त्याच निकषानुसार ३६ हजार ३५९ तर मुंबईला त्याच निकषानुसार १७ हजार ९४६ इतकी तर लखनौला ११ हजार ९८७ एवढी प्रति दशलक्ष वाढ असल्याचे दिसून येत आहे. त्यापाठोपाठ बेंगळुरु, भोपाळ, इंदोर, दिल्ली आणि पटना या संख्येचा समावेश आहे. इतकी विदारक परिस्थिती असूनही जिल्ह्यात मनमुक्तपणे भटकणाऱ्या नागरिकांवर कारवाई का होत नाही, कठोर उपायांची अंमलबजावणी का होत नाही असाच सवाल नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे.
इन्फो
महिनाभरात जिल्ह्यात १ लाख १६ हजारांवर वाढ
जिल्ह्यात मार्च महिन्यापासून रुग्णसंख्या वाढीने मोठा वेग पकडला. त्यातदेखील १५ मार्चपासून कोरोनावाढ सातत्याने ३ ते ४ हजारांवर कायम राहिली. त्यामुळेच १६ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत नाशिकमध्ये तब्बल १ लाख १६ हजारांवर वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळेच आतापर्यंत जिल्ह्यात किमान चार-पाच घरांमागे किमान एक व्यक्ती बाधित असे चित्र दिसू लागले आहे.
इन्फो
महिनाभरात तब्बल ६७३ बळी
जिल्ह्यात मार्च महिन्याच्या मध्यापासून कोरोनाबळींच्या संख्येतदेखील मोठी वाढ होऊ लागली. १६ मार्चला जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या २१८४ झाली होती तर १६ एप्रिलला एकूण बळीसंख्या तब्बल २८५७ वा पोहोचली आहे. म्हणजेच या महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ६७३ नागरिकांचा बळी कोरोनाने गेला आहे.