मुख्यमंत्रीच नव्हे, तर महाराष्ट्रही आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2022 01:50 AM2022-03-02T01:50:11+5:302022-03-02T01:52:23+5:30
महाराष्ट्रात सध्या विचित्र स्थिती आहे. मुख्यमंत्री कुठेही जात नाहीत आणि मंत्रालयात तसेच कॅबिनेटच्या बैठकींनाही जात नाहीत. मुख्यमंत्रीच नव्हे, तर महाराष्ट्रच आजारी पडल्याची टीका केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. राज्यात अनेक मंत्री घेाटाळ्यात अडकले आहेत. अनेकांची मंत्रालयातील खुर्ची हालते आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मंत्रालयात जायलाही घाबरतो, अशी सडकून टीकाही त्यांनी केली आहे.
नाशिक : महाराष्ट्रात सध्या विचित्र स्थिती आहे. मुख्यमंत्री कुठेही जात नाहीत आणि मंत्रालयात तसेच कॅबिनेटच्या बैठकींनाही जात नाहीत. मुख्यमंत्रीच नव्हे, तर महाराष्ट्रच आजारी पडल्याची टीका केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. राज्यात अनेक मंत्री घेाटाळ्यात अडकले आहेत. अनेकांची मंत्रालयातील खुर्ची हालते आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मंत्रालयात जायलाही घाबरतो, अशी सडकून टीकाही त्यांनी केली आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने आडगाव शिवारात साकारण्यात येणाऱ्या आयटी हबच्या प्रोत्साहनासाठी नाशिक आयटी इन्क्लेव्ह २०२२ चे आयोजन मंगळवारी (दि.१) येथील हॉटेल ताजमध्ये करण्यात आले हेाते. त्यावेळी ते बोलत होते. नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते, तर माजी मंत्री जयकुमार रावल, ज्येष्ठ नेते प्रकाश पाठक, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले तसेच सीमा हिरे यांच्यासह महापालिकेचे अन्य पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
राज्यातील प्रमुख अडीचशे आयटी कंपन्यांचे प्रतिनिधी या परिषदेेला उपस्थित होते. उद्योजकांना काय हवे आहे, ते त्यांनी सांगण्याच्या आत देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असे सांगताना महाराष्ट्र मात्र गेल्या काही वर्षांपासून उद्योग क्षेत्रात मागे पडला आहे. त्याचे कारण राज्यात आलेल्या सरकारकडून विकास, शिक्षण, प्रगती यासारख्या मुद्यांवर चर्चाच होत नाही असे सांगून राणे म्हणाले की, राज्यात सध्या तोडफोडीचे राजकारण सुरू आहे. भाजपशी गद्दारी करून तसेच मराठी आणि हिंदुत्ववादाला मूठमाती देऊन मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मेहेरबानीवर टिकून आहे. महाराष्ट्राचे शाेषण सुरू असून अनेक नेते जेलमध्ये जाण्याच्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत, असेही ते म्हणाले. राज्यातील अनेक मंत्र्यांच्या खुर्च्या हालत आहेत. मंगळवारी (दि.१) युक्रेनमधून भारतीय विद्यार्थी मुंबईत विमानाने दाखल झाले. मात्र, त्यांच्या स्वागतासाठी देखील मुख्यमंत्री आले नाहीत. मंत्रालयातही ते जात नाहीत, महाराष्ट्रच आजारी पडला आहे, असे ते म्हणाले.
इन्फो..
भिवंडीच्या धर्तीवर नाशिकच्या आयटी पार्कला मंजुरी
भिंवडीमध्ये पाचशे एकरमध्ये आयटी पार्क साकारण्याचा प्रस्ताव आहे, त्याच धर्तीवर नाशिकमध्येही आयटी पार्कचा प्रस्ताव पाठवल्यास तो मंजूर केला जाईल, असे राणे यांनी सांगितले.
इन्फो..
खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती ईडीला देण्यात येईल, असे सांगितले. त्यावर सेनेच्या नेत्यांच्या आणि भ्रष्टाचाराची चोपडी आपल्याकडे असून ती देखील ईडीला देण्यात येणार असल्याचे नारायण राणे म्हणाले. राऊत यांच्यापेक्षा शिवसेनेच्या नेत्यांची मला जास्त माहिती आहे, असे ते म्हणाले.
इन्फेा...
दिशा सालियन प्रकरणात नारायण राणे पितापुत्रांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रथमच त्यावर भाष्य करताना राणे यांनी दिशा सालियनवर अत्याचार झालेत. तिच्या मारेकऱ्यांवर कारवाई करावी आणि तिला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी आम्हाला साथ दिली पाहिजे, असे सांगून राणे यांनी दिशाचे तिच्या कुटुंबीयांशी पटत नसल्याने मुळातच ती त्यांच्यासमवेत राहत नसल्याचे राणे यांनी सांगितले.