...पण मोडला नाही रितेशचा कणा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 11:01 PM2020-07-29T23:01:34+5:302020-07-30T01:47:41+5:30
नाशिक : ‘भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले !’ या कुसुमाग्रजांच्या प्रख्यात ‘कणा’ कवितेचीच क्षणोक्षणी आठवण व्हावी, अशाच साऱ्या घटना रितेश अजय भोपळे या दहावीतील कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मुलाबाबतही घडल्या. घरातील सारं काही गोदावरीच्या पुरात गतवर्षी वाहून गेल्याने काही दिवस मावशीच्या घरी, तर काही दिवस एका ८ बाय ८ च्या खोलीत राहून रितेशने अभ्यासाचा ध्यास कायम ठेवला. दुसऱ्यांच्या घरी पोळ्या लाटायला जाणारी आई आणि किराणा दुकानात काम करणाºया वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत रितेशने तब्बल ९७ टक्के गुण मिळवत जिद्द आणि कष्टाला काहीच असाध्य नसते, याचीच प्रचिती दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

ज्याच्या जिद्दीला सलाम करावा असाहा रितेश सीबीएसवरील डी. डी. बिटको स्कूलचा विद्यार्थी! कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताचीच किंबहुना कठीणच. घरात लक्ष्मी नसली तरी सरस्वती मात्र नांदत आहे. कौटुंबिक परिस्थितीच्या जाणिवेतूनच रितेशने कष्टाने यश साध्य केले. त्याने दहावीच्या परीक्षेत ९७.५० टक्के इतके घवघवीत गुण मिळवले आहेत. रितेश पहिल्यापासूनच शाळेत अव्वल नंबर मिळवत आला. दहावीचे वर्ष हे महत्त्वाचे असल्याने त्याचा अभ्यास मध्यरात्री दोन वाजेपर्यंत चालायचा. घारपुरे घाट परिसरातील लहानशा घरात अभ्यास करताना परिसरातील गोंगाट चालायचा; परंतु सर्वाधिक त्रास गेल्या वर्षीच्या पुराचा झाला. गोदावरी नदीला आॅगस्ट महिन्यात आलेल्या पुराने होते नव्हते वाहून गेले. वह्या-पुस्तके, दप्तर सर्व गेल्यानंतरदेखील त्याने जिद्द बाळगली. कॉलेजरोडला मावशीकडे एका छोट्या क्वॉर्टरमध्ये राहुन त्याने अभ्यास केला. विशेष म्हणजे कॉलेजरोडवरून पायपीट करीत सकाळी ७ वाजता सीबीएसला शाळेत आणि तेथून परत घरी. दीड वाजता घारपुरे घाटावर पुन्हा क्लासला पायीच आणि नंतर तेथून पुन्हा साडेचार वाजेनंतर घरी असा प्रवास रोजच केला.
रात्री दोन- दोन वाजेपर्यंत अभ्यास करणाºया रितेशने अखेरीस त्याला हवे ते यश प्राप्त केले आणि तब्बल ९७.२० टक्के यश मिळवले. रितेशच्या यशाने कुटुंबीय भारावून गेले आहे. रितेशची मोठी बहीणदेखील शिक्षणात पुढे असून, ती सध्या अभियांत्रिकी पदवीच्या अखेरच्या वर्षाला आहे आता रितेशने पुढे एमबीए करण्याचा मानस व्यक्त केला आहे. आकांक्षा पुढती गगन ठेंगणे हेच त्याने दाखवून दिले.