नोटा काढणाऱ्यांच्या बोटाला शाई

By admin | Published: November 18, 2016 12:28 AM2016-11-18T00:28:56+5:302016-11-18T00:28:40+5:30

रांगा कायम : आजपासून दोन हजारच मिळणार असल्याने नागरिक हवालदिल

Notebook fingerprint ink | नोटा काढणाऱ्यांच्या बोटाला शाई

नोटा काढणाऱ्यांच्या बोटाला शाई

Next

नाशिक : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे गुरुवारी (दि. १७)देखील शहरातील बँकांमध्ये पैसे बदलण्यासाठी आणि खात्यातून पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. विशेष म्हणजे गर्दी टाळण्यासाठी सरकारच्या निर्देशानुसार टपाल कार्यालयात गुरुवारपासून नागरिकांच्या बोटाला शाई लावण्यास प्रारंभ झाला. दिवसभरात जिल्ह्यातील टपाल कार्यालयातून एक कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. दुसरीकडे शुक्रवारपासून बॅँकेत दोन हजार रुपये मिळणार असल्याच्या बातमीमुळे गुरुवारी बॅँक आणि टपाल कार्यालयात रांगा अधिकच वाढल्या.
चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांची होणारी गर्दी बघता सरकारने बोटावर शाई लावण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी शहरातील बँकांंमध्ये मात्र नागरिकांच्या बोटाला शाई लावण्यात आली नाही, परंतु पोस्टाच्या मुख्यालयात चलन बदलण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या उजव्या हाताच्या बोटाला शाई लावण्यात येत होती. शहरातील बँकांमध्ये अजून ही शाईच दाखल झालेली नसल्याचे बँक शाखा अधिकाऱ्यांनी सांगितले.
बँकांमध्ये जशी चलन बदलण्यासाठी गर्दी होती तशीच गर्दी एटीएम केंद्रांबाहेरही बघायला मिळत होती. एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याने एटीएमच्या कार्यक्षमतेवरही परिणाम झाला आहे. एटीएम मशीनमध्ये केवळ शंभर रुपयांचाच भरणा केला जात असल्याने मशीनमधल्या नोटा लवकर संपून ग्राहकांच्या पदरी निराशा पडत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत सकाळपासूनच दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कॅश डिपॉझिट मशीन (सीडीएम)मधून आपल्या खात्यावर पैसे जमा करता येत असले तरी याठिकाणीही मोठ्या रांगा लागल्या होत्या. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखा वगळता इतर राष्ट्रीयीकृत, नागरी तसेच खासगी बँकांमधील गर्दी दुपारी ओसरली होती.
लग्नसराई जवळ आल्याने अनेक नागरिकांना लग्नाची खरेदी करायची होती, परंतु नोटा बंदीच्या निर्णयामुळे अनेकांची लग्ने खोळंबलेली असताना गुरुवारी दिल्ली येथे केंद्रीय अर्थसचिव शशिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत ज्यांच्या घरी लग्नकार्य आहे त्यांना आता बँक खात्यातून अडीच लाख रुपये काढता येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार (दि. १८) पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार असला तरी आता साधारण नागरिकांना आपल्या खात्यातून केवळ दोन हजार रुपये मिळणार असल्याने चलन टंचाई वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेवर होणार असून, आर्थिक उलाढाल ठप्प होण्याची भिती व्यावसायिक आणि नागरिक व्यक्त करीत आहेत. एकीकडे प्रेसमध्ये नोटांची छपाई वाढविण्यात आली असून, दररोजच नोटा रिझर्व्ह बॅँकेकडे पोहचत असताना मर्यादा घटविण्याचे कारण काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.नोटा बदलण्यासाठी टपाल कार्यालयात आलेल्या ग्राहकाच्या बोटावर अशी शाई लावण्यात आली.

Web Title: Notebook fingerprint ink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.