रस्त्यांवरील १४८ धार्मिक स्थळांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 07:46 PM2017-10-30T19:46:19+5:302017-10-30T19:52:15+5:30

अनधिकृत बांधकाम : ३० नोव्हेंबरपर्यंत कारवाईसाठी मुदत

Notice to 148 religious places on the roads | रस्त्यांवरील १४८ धार्मिक स्थळांना नोटिसा

रस्त्यांवरील १४८ धार्मिक स्थळांना नोटिसा

googlenewsNext
ठळक मुद्देसन २००९ पूर्वीची अनधिकृत धार्मिक स्थळे ३० नोव्हेंबरपर्यंत हटविण्याची अंतिम मुदत१० नोव्हेंबरनंतर कधीही अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई होण्याची शक्यता

नाशिक : न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील सन २००९ पूर्वीची अनधिकृत धार्मिक स्थळे ३० नोव्हेंबरपर्यंत हटविण्याची अंतिम मुदत असल्याने, महापालिकेने रस्त्यांवर अडथळा ठरणाऱ्या  १४८ अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटिसा बजावल्या आहेत. येत्या १० नोव्हेंबरनंतर सदर धार्मिक स्थळांविरुद्ध कारवाईची मोहीम राबविली जाण्याची शक्यता असून, त्यावर मंगळवारी (दि.३१) आयुक्तांकडे होणाऱ्या  बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार, सन २००९ पूर्वीची आणि नंतरच्या अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली होती. पहिल्या टप्प्यात महापालिकेने सन २००९ नंतरची अनधिकृत धार्मिक स्थळे हटवितानाच महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामांवरही बुलडोझर चालविला होता. त्यावेळी महापालिकेने १०५ धार्मिक स्थळांवर कारवाई केली होती. मात्र, शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर व भागवत आरोटे यांच्यासह काही मंडळे/संस्था यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर कारवाईला ब्रेक बसला होता. दरम्यान, मोकळ्या भूखंडावरील अनधिकृत धार्मिक स्थळांबाबतचा प्रश्न प्रलंबित असल्याने आणि येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाकडूनच अल्टिमेटम असल्याने महापालिकेने रस्त्यांवर असलेल्या १४८ धार्मिक स्थळांना नोटिसा बजावल्या आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत सदर धार्मिक स्थळांवर नोटिसा चिकटविण्याचे काम सुरू आहे. त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. सदर कारवाईसाठी महापालिकेने पोलीस बंदोबस्ताचीही मागणी केली आहे. त्यामुळे दि. १० नोव्हेंबरनंतर कधीही अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Web Title: Notice to 148 religious places on the roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.