पूर्व विभागातील ४० लेटलतिफांना नोटिसा
By admin | Published: July 11, 2017 12:20 AM2017-07-11T00:20:44+5:302017-07-11T00:21:00+5:30
पूर्व विभागातील ४० लेटलतिफांना नोटिसा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मागील सप्ताहात पंचवटी विभागीय कार्यालयात लेटलतिफ कर्मचाऱ्यांना महापौरांनी दणका दिल्यानंतरही मनपा कर्मचारी सुधरायला तयार नाहीत. सोमवारी (दि.१०) पूर्व विभागीय कार्यालयाला प्रशासन उपआयुक्तांनी अचानक भेट दिल्यानंतर ४० कर्मचारी लेटलतिफ आढळून आले.
‘लोकमत’ने मागील सप्ताहात केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये पंचवटी विभागीय कार्यालयातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणला होता. लोकमतच्या या वृत्ताची दखल घेत महापौर रंजना भानसी यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी पंचवटी विभागीय कार्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी २८ कर्मचारी लेटलतिफ आढळून आले होते. संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश महापौरांनी दिले. दरम्यान, सोमवारी (दि.१०) प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी पूर्व विभागीय कार्यालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी हजेरी मस्टरवर ४० कर्मचारी कामावर उशिराने आल्याचे निदर्शनास आले. संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, अन्य विभागीय कार्यालयांनाही कधीही भेट देऊन पाहणी केली जाणार असल्याचे फडोळ यांनी सांगितले.