शहरातील ४२ हजार मिळकतधारकांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:35 AM2018-12-11T01:35:07+5:302018-12-11T01:35:25+5:30
नाशिक : यापूर्वी बांधकाम करूनही घरपट्टी लागू न झालेल्या शहरातील ६२ हजार पैकी ४२ हजार मिळकतींना महापालिकेने सहा वर्षे ...
नाशिक : यापूर्वी बांधकाम करूनही घरपट्टी लागू न झालेल्या शहरातील ६२ हजार पैकी ४२ हजार मिळकतींना महापालिकेने सहा वर्षे मागे जाऊन नवीन भाडेमूल्यानुसार करआकारणीच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे शहरात भडका उडाला असून, राजकीय पक्ष विरोधासाठी सरसावले आहे. यासंदर्भात, शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी आणि भाजपा आमदार सीमा हिरे यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन दिले असून, करवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. येत्या दि. १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या महासभेत यासंदर्भात भाजपा आणि सेनेने लक्षवेधी देण्याची तयारी सुरू केली असून, त्यामुळे हा विषय गाजण्याची शक्यता आहे.
महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दि. १ एप्रिलपासून वार्षिक भाडेमूल्यात वाढ केली आहे ही वाढ त्यांनी नव्या मिळकतींना लागू राहील, असे स्पष्ट केले होते. तथापि, घरपट्टी लागू न झालेल्या ज्या ६२ हजार मिळकती महापालिकेला आढळल्या त्यांना ही करवाढ लागू करण्यात आली असून, आता नोटिसा बजावतांना त्यांना पूर्वलक्षी पद्धतीने थकबाकी आणि दंडात्मक रक्कम आकारणीच्या नोटिसा बजावण्यास प्रारंभ झाला आहे. महापालिकेच्या घरपट्टी विभागाने आत्तापर्यंत ६२ पैकी ४२ हजार मिळकतींना नोटिसा बजावल्या आहेत.
मनपा आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष
महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांना तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांना वार्षिक भाडे मुल्य आकारणीच्या माध्यमातून करवाढ करण्यास कडाडून विरोध केला होता. सरसकट सर्व करवाढ रद्द करावी, अशी मागणी होत होती. त्यासाठी सर्वपक्ष एकत्र आले होते आणि मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानंतर मुंढे यांनी सरासरी ५० टक्के दर कमी केले असले तरी संपूर्ण करवाढ रद्द न झाल्याने आता महासभेच्या निमित्ताने भाजपासह सर्वच पक्षांना संधी चालून आली असून, आयुक्त राधाकृष्ण गमे याबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.