कामे टाळणाऱ्यांवर कारवाईची सूचना
By Admin | Published: August 27, 2016 12:34 AM2016-08-27T00:34:56+5:302016-08-27T00:35:13+5:30
कामे टाळणाऱ्यांवर कारवाईची सूचना
नाशिक : गेली अनेक वर्षे ग्रामीण विकास यंत्रणेच्या विकासकामांच्या आढाव्यापुरतीच मर्यादित असलेल्या ‘दक्षता’ समितीला अधिक व्यापक स्वरूप देत कार्यपद्धतीत बदल करण्यात येऊन दक्षताऐवजी ‘दिशा’ असे नामकरण करण्यात आलेल्या समितीची शुक्रवारी पहिलीच बैठक झाली.
गेल्या तीन वर्षापासून पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कामे मंजूर होऊनही अधिकारी, ठेकेदारांकडून कामे सुरू करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने त्यांच्याविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सूचना समितीचे अध्यक्ष तथा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिली. ज्या खात्यांकडून कामे होणार नाहीत, त्यांची तक्रार थेट पीएमओ कार्यालयात करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्याची माहितीही या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात तब्बल चार तास ही बैठक चालली.(पान ७ वर)
शासनाने समितीची व्यापकता वाढविली असून, केंद्र व राज्य सरकारच्या ताब्यातील सर्व खात्याचे प्रमुख या समितीचे सदस्य असतील तसेच महापालिकेचे महापौर, आयुक्ततसेच सर्व नगरपालिकांचे नगराध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी असे सर्व या समितीचे सदस्य आहेत. दर तीन महिन्यांनी यासमितीची बैठक होईल. केंद्र व राज्य सरकारच्या सर्व खात्यांच्या कामकाजाचा यावेळी आढावा घेण्यात आला.
दिशा समितीच्या नवीन कार्यपद्धतीनुसार ज्या शासकीय खात्याचे अधिकारी कामचुकारपणा करीत असल्याची समितीची भावना निश्चित झाल्यास त्याची थेट तक्रार पंतप्रधान कार्यालयात करण्याची सूचना समिती अध्यक्षांना देण्यात आल्या आहेत, त्याची माहिती खासदार चव्हाण यांनी बैठकीत दिली. या बैठकीसाठी रेल्वेचे अधिकारी अगोदर हजर नसल्याचे लक्षात येताच, त्यांना दूरध्वनीकरून बोलवून घेण्यात आले व तंबी देण्यात आली.