पावसाळी गटारीत सांडपाणी जोडणाऱ्यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 01:10 AM2019-04-26T01:10:17+5:302019-04-26T01:10:34+5:30
महापालिकेच्या वतीने गोदावरी नदीच्या शुद्धीकरणांतर्गत गटारीचे अथवा सांडपाणी पावसाळी गटारींना जोडणाऱ्यांची शोध मोहीम सुरू झाली आहे. त्याअंतर्गत सुमारे आठ ते दहा जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
नाशिक : महापालिकेच्या वतीने गोदावरी नदीच्या शुद्धीकरणांतर्गत गटारीचे अथवा सांडपाणी पावसाळी गटारींना जोडणाऱ्यांची शोध मोहीम सुरू झाली आहे. त्याअंतर्गत सुमारे आठ ते दहा जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदीची पुन्हा दुरवस्था होत असून, त्या पार्श्वभूमीवर रामकुंडासह अन्य पात्रे स्वच्छ करण्यात येत आहेत.
गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, त्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेतला जात आहे. रिव्हर तसेच सिव्हर वेगळे करण्याचेदेखील यापूर्वीच आदेशित करण्यात आले आहे. त्यासाठी महापालिकेने पाहणीदेखील केली आहे. आता महापालिकेने अशी ठिकाणे शोधून संंबंधितांना नोटिसा पाठविणे सुरू केले आहे. परीचा बाग आणि चव्हाण मळा याठिकाणी सुमारे आठ ते दहा ठिकाणी अशाप्रकारची चुकीची गटार जोडणी केल्याचे आढळल्यानंतर महापालिकेने त्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
महापालिकेच्या वतीने रामकुंड आणि परिसरातील तीन कुंड पूर्णत: रिक्त करून त्याठिकाणी स्वच्छता
मोहीम राबवली जात आहे. रामकुंड परिसरातील कुंडांमध्ये कचरा आणि निर्माल्य मोठ्या प्रमाणात टाकले जाते.
त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येत असून, त्यामुळे या भागातून येणारी दुर्गंधी कमी
झाली आहे.