साधुग्रामसाठी आता बिल्डरांना नोटिसा

By admin | Published: January 31, 2015 12:41 AM2015-01-31T00:41:49+5:302015-01-31T00:42:38+5:30

२०८ एकर ताब्यात : पांझरापोळची जागाही रडारवर

Notice to builders now for Sadhugram | साधुग्रामसाठी आता बिल्डरांना नोटिसा

साधुग्रामसाठी आता बिल्डरांना नोटिसा

Next

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधु-महंतांसाठी साधुग्राम साकारण्यासाठी शेतकऱ्यांच्या जागा ताब्यात घेतल्यानंतर आता प्रशासनाने तपोवनातील बांधकाम व्यावसायिकांकडे आपला मोर्चा वळविला असून, जवळपास ६० एकर क्षेत्राचे मालक असलेल्या बिल्डरांना कायदेशीर नोटिसा बजावून त्यांना म्हणणे मांडण्याची मुभा देण्यात आली आहे. दुसरीकडे पांझरापोळच्या ताब्यात असलेली जागाही ताब्यात मिळावी यासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत.
गेल्या महिन्याभरात नाशिक तहसीलदारांकरवी तपोवनातील १५४ एकर जागा शेतकऱ्यांच्या ताब्यातून घेण्याची कार्यवाही पूर्ण झाली असून, नाशिक महापालिकेच्या मालकीची ५४ एकर अशाप्रकारे २०८ एकर जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येऊन त्यावर युद्धपातळीवर कामे सुरू झाली आहेत. परंतु यंदा कुंभमेळ्यात तीन आखाडे व ७७० खालसे सहभागी होणार असल्यामुळे साधुग्रामसाठी ३२५ एकर जागेची मागणी साधु-महंतांनी नोंदविली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची दमछाक होत असून, त्यातही कायदेशीर अडथळे पार करीत १५४ एकर जागा प्रत्यक्ष ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे. ज्यांच्याकडून जागा ताब्यात घेतली त्यांना पहिल्या टप्प्यात भाड्यापोटी द्यावयाच्या ४० टक्के रकमेचे वाटप येत्या एक-दोन दिवसात करण्यात येणार आहे.
सदरची रक्कम थेट जागामालक शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यातच जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी पंधरा कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. सध्या प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या एकूण जागेपेक्षा तपोवनातच काही बांधकाम व्यावसायिकांच्याही ताब्यात जागा असून, पांझरापोळकडेही ५० एकरच्या आसपास अशाप्रकारे ११८ एकर जागा शिल्लक आहे. सदरची जागा ताब्यात मिळाल्यास साधु-महंतांची मागणी व साधुग्रामची निकड पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे पाहून दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने बिल्डरांना नोटिसा दिल्या आहेत.
यापूर्वीही बिल्डरांकडे जागेची तोंडी मागणी करण्यात आली होती, परंतु त्यांनी रेडीरेकनरनुसार जागेचे भाडे मिळावे, अशी मागणी केल्यामुळे तूर्त प्रशासनाने त्यांच्याबाबत नरमाईची भूमिका घेत अगोदर शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित केले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Notice to builders now for Sadhugram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.