तपोवन मलनिस्सारण केंद्राच्या ठेकेदारास नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 01:48 AM2019-06-15T01:48:09+5:302019-06-15T01:49:11+5:30
महापालिकेच्या तपोवन येथील मलनिस्सारण केंद्रातील प्रक्रियायुक्त मलजल निकषापेक्षा जादा प्रदूषित असल्याने प्रशासनाने संबंधित केंद्र चालविणाऱ्या ठेकेदारास नोटीस बजावली आहे. जलनियमानुसार कारवाई का करू नये अशाप्रकारची विचारणा प्रशासनाने संबंधित ठेकेदारास केली आहे.
नाशिक : महापालिकेच्या तपोवन येथील मलनिस्सारण केंद्रातील प्रक्रियायुक्त मलजल निकषापेक्षा जादा प्रदूषित असल्याने प्रशासनाने संबंधित केंद्र चालविणाऱ्या ठेकेदारास नोटीस बजावली आहे. जलनियमानुसार कारवाई का करू नये अशाप्रकारची विचारणा प्रशासनाने संबंधित ठेकेदारास केली आहे.
महापालिकेच्या वतीने शहरात विविध भागात मलनिस्सारण केंद्रे चालवण्यास देण्यात आली आहेत. मात्र ती योग्य पद्धतीने चालत नसल्याच्या तक्रारी वेळोवेळी
झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा न्यायालयात आणि बाहेरही गाजत असल्याने यासंदर्भात शासकीय यंत्रणादेखील सजग झाल्या आहेत.
गेल्या महिन्यात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने विविध
भागात पाण्याचे नमुने घेतले होते. प्रवाही पाण्यात पाच तर प्रक्रियायुक्त पाण्यात दहा इतका बीओडी अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र ते कैकपटीने अधिक असल्यानेदेखील या विषयाला गांभीर्याने घेण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेनेदेखील संबंधित ठेकेदारास नोटीस बजावली आहे.
संबंधित कार्यकारी अभियंत्याला नोटीस
महापालिकेच्या वतीने आगर टाकळी येथील मलनिस्सारण केंद्रात येणाºया अविघटनकारी घटकांबाबतदेखील संबंधित कार्यकारी अभियंत्याला नोटीस बजावून जाब विचारला असल्याचे वृत्त आहे.