अतिक्रमण केलेल्या उद्योजकांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:15 AM2018-07-10T00:15:17+5:302018-07-10T00:15:38+5:30
लहान-मोठ्या उद्योगांनी कंपनीच्या बाहेर सामासिक अंतरात वाहनांसाठी उभारलेले पार्किंग त्वरित हटविण्याच्या नोटिसा एमआयडीसीने पाठविल्या असून, आता पार्किंगची सोय कुठे करावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सातपूर : लहान-मोठ्या उद्योगांनी कंपनीच्या बाहेर सामासिक अंतरात वाहनांसाठी उभारलेले पार्किंग त्वरित हटविण्याच्या नोटिसा एमआयडीसीने पाठविल्या असून, आता पार्किंगची सोय कुठे करावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत बहुतांश लहान-मोठ्या उद्योजकांनी रस्ता आणि कंपनी या सामासिक अंतरात स्वत:च्या आणि कामगारांच्या वाहनांसाठी पार्किंग शेड उभारलेले आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अशा उद्योगांना नोटिसा पाठविल्या असून, सामासिक अंतरातील अनधिकृत पार्किंग काढून घेण्यात यावे आणि एमआयडीसीने दिलेल्या जागेतच (कंपनीच्या आत) पार्किंगची व्यवस्था करावी. सात दिवसांच्या आत अनधिकृत पार्किंग हटविण्याचे या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. यात बऱ्याच मोठ्या उद्योगांनी सामासिक अंतरात सर्रास वाहनतळ उभारले आहे. त्यांनाही कंपनीच्या आतमध्ये पार्किंगची व्यवस्था करावी लागणार आहे. नोटिसा आलेल्या उद्योजकांनी निमाकडे धाव घेतली आहे. आपल्या कंपनीच्या बाहेर आपली वाहने लावणे चुकीचे नसल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले आहे.
उद्योजकांकडून आश्चर्य व्यक्त
एरव्ही औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाºयांवर निष्काळजी आणि निष्क्रिय असल्याचा आरोप केला जातो. प्रत्यक्षात रविवार साप्ताहिक सुटीचा दिवस असूनही या कर्मचाºयांनी उद्योजकांना नोटिसा बजावण्याचे कर्तव्य पार पाडल्याने उद्योजकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एमआयडीसीने उद्योजकांना पाठविलेल्या नोटिसा चुकीच्या आहेत. उलट कंपनी मालक सामासिक अंतर स्वच्छ ठेवत असतो. पार्किंगच्या जागेवर पेव्हर ब्लॉक लावून पार्किंग करणे गैर नाही. काही उद्योजकांना कंपनीच्या आवारात पार्किंगला जागा नाही. त्यांनी काय करावे? उद्योजकांनी घाबरू नये, निमा त्यांच्या पाठीशी आहे. लवकरच अधीक्षक अभियंता नितीन वानखेडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून यावर मार्ग काढण्यात येईल.
- मंगेश पाटणकर, अध्यक्ष, निमा