पालिकेचा पाय खोलात : माफीनाफ्याच्या नामुष्कीनंतर माजी महापौरांना नोटीस ‘ग्रीनफिल्ड’वर पुन्हा कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:37 AM2018-05-27T01:37:44+5:302018-05-27T01:37:44+5:30
नाशिक : अग्निशमन विभागासह बांधकाम आणि पर्यावरण विभागामार्फत माजी महापौर प्रकाश मते यांना त्यांच्याच मालकीच्या केनिंगस्टन क्लबची रिटेंनिग वॉल पडून महापालिकेने नदीलगत उभारलेल्या गॅबियन वॉलचे नुकसान झाल्याबद्दल १ कोटी ४० लाख रुपये नुकसानभरपाईची नोटीस बजावण्यात आली आहे.
नाशिक : आनंदवल्ली शिवारातील ग्रीनफिल्ड लॉन्सची संरक्षक भिंत स्थगिती आदेश असतानाही पाडून टाकल्याबद्दल उच्च न्यायालयात महापालिका आयुक्तांवर माफी मागण्याची नामुष्की ओढवल्यानंतर काही तासांतच महापालिकेच्या अग्निशमन विभागासह बांधकाम आणि पर्यावरण विभागामार्फत माजी महापौर प्रकाश मते यांना त्यांच्याच मालकीच्या केनिंगस्टन क्लबची रिटेंनिग वॉल पडून महापालिकेने नदीलगत उभारलेल्या गॅबियन वॉलचे नुकसान झाल्याबद्दल १ कोटी ४० लाख रुपये नुकसानभरपाईची नोटीस बजावण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. २५) उच्च न्यायालयात झालेल्या नाचक्कीनंतर दोन-अडीच तासांतच महापालिकेकडून या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
महापालिकेने मते यांच्या मालकीच्या ग्रीनफिल्ड लॉन्सची संरक्षक भिंत न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही पाडून टाकण्याची कारवाई केली होती. त्यावर उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होऊन न्यायालयासमोर आयुक्त तुकाराम मुंढे यांना माफी मागावी लागली होती आणि तोडलेली संरक्षक भिंत पुन्हा बांधून देण्याची ग्वाही द्यावी लागली होती. या प्रकरणामुळे महापालिकेची मोठी नाचक्की झाली. त्यातून महापालिकेच्या एकूणच चाललेल्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. शुक्रवारी उच्च न्यायालयाने दुपारी ३ वाजेच्या सुमारास आपला आदेश दिला आणि त्यानंतर दोन-अडीच तासांनी माजी महापौर प्रकाश मते यांच्या हाती महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून रिटेंनिग वॉलबद्दलची नोटीस पडली शिवाय, नुकसानभरपाई म्हणून १ कोटी ४० लाख रुपये जमा करण्याचेही आदेशित करण्यात आले.
माजी महापौर प्रकाश मते यांच्या मालकीची केनिंगस्टन क्लबची जागा चांदशी शिवारात आहे. गोदावरी नदीलगत जाणाऱ्या शिवरस्त्याशेजारी क्लबची रिटेनिंग वॉल आहे. सदर आरसीसी रिटेनिंग वॉल ही महापालिकेने नदीलगत बांधलेल्या गॅबियन वॉलवर पडून तिचे नुकसान झाल्याचा दावा महापालिकेच्या अग्निशमन विभागाने नोटिशीत केला आहे. नदीपात्रात सदर रिटेनिंगचा मलबा पडून गोदापात्रातील प्रवाहमार्गात अडथळा निर्माण झाला आहे. सदर आपत्तीमुळे नदीपात्रालगतच्या जीविताला व मालमत्तांना धोका पोहोचण्याची संभावना निर्माण झाली आहे.
सदर अडथळा चोवीस तासांत काढून घ्यावा, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे. याचबरोबर तातडीने दुसरी नोटीस बजावतानाही नुकसानभरपाई म्हणून १ कोटी ४० लाख रुपये भरण्याचे आदेशित करण्यात आले आहे. उच्च न्यायालयात फटकारे बसल्यानंतर काही तासांतच महापालिकेने नोटिसा पाठविण्याची कार्यवाही केल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.