कार्यकारी अभियंत्याकडून चार ठेकेदारांना नोटिसा
By admin | Published: February 16, 2017 01:06 AM2017-02-16T01:06:25+5:302017-02-16T01:07:00+5:30
जलयुक्त शिवार : कामे खोळंबली
नाशिक : शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त अभियानातील पेठ व दिंडोरी तालुक्यातील सुमारे २५ ते ३० लाखांची सीमेंट बंधारे व दुरुस्तीची कामे खोळंबल्याचे कारण देत कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांनी चार ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
विशेष म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या नाशिक तालुक्यातील सुमारे सात ते आठ कोटींची जलसंधारणाची कामे पूर्ण होऊनही या कामांना २५ टक्के निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत विभागाने पावणे चार कोटींची मागणी सरकारकडे केली आहे.
दिंडोरी तालुक्यातील ठेपणेपाडा येथील सुमारे पंधरा लाखांचे सीमेंट बंधाऱ्याचे काम २ जानेवारी २०१७ रोजी कार्यारंभ आदेश देऊनही फेब्रुवारी उजाडून हे काम सुरू झाले नसल्याचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांच्या पाहणीत त्यांना आढळून आले होते. त्यामुळे त्यांनी हे काम ज्यांच्या नावावर आहे ते सुशिक्षित बेरोजगार अभियंता अनिल ढमाळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हे काम ३१ मार्च २०१७ पूर्वी होणे अपेक्षित आहे. असाच प्रकार पेठ व दिंडोरी तालुक्यातील अन्य तीन कामांबाबत झाल्याने सुशिक्षित बेरोजगार अभियंता रोहित चव्हाण, दीपाली काकळीज तसेच अन्य एका सुशिक्षित बेरोजगार अभियंता अशा तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही कामे ३१ मार्च २०१७ पूर्वी पूर्ण करण्याचे सरकारने जिल्हा परिषदेला व जिल्हा परिषदेने संबंधित मक्तेदारांना दिले आहेत.
(प्रतिनिधी)