अनियमित कामकाजामुळे बाजार समिती संचालकांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:11 AM2021-07-15T04:11:42+5:302021-07-15T04:11:42+5:30
बाजार समिती २०१५ ते २०२० कालावधीत संचालक मंडळात सदस्य म्हणून कार्यरत संचालकांच्या कार्यकाळात अनियमितता व आर्थिक नुकसान होत असल्याची ...
बाजार समिती २०१५ ते २०२० कालावधीत संचालक मंडळात सदस्य म्हणून कार्यरत संचालकांच्या कार्यकाळात अनियमितता व आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार सहकार विभागाला प्राप्त झाल्याने तालुका उपनिबंधकांकरवी या तक्रारीची प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. त्याचा आधार घेत ही नोटीस बजावण्यात आली आहे. या चौकशी अहवालात फर्निचर खरेदी, भाडे कमी केल्याने नुकसान, रंगकाम दुरुस्ती काम, प्रवेशद्वार, केबिन बांधकाम, सेलहॉल व शेतकरी निवास दुरुस्ती, सीसीटीव्ही कॅमेरे, संरक्षक भिंत, ड्रेनेज तसेच मनपा परवानगी न घेता सेल हॉल बांधकाम केल्याचे व काही कामांना खात्याची परवानगी असली तरी निविदा काढली नाही. ई निविदा पद्धत वापरून कामे केली नाहीत. स्थानिक प्राधिकरण पूर्व परवानगी नाही. हॉटेल, टपरी भाडे कमी केल्याने बाजार समितीचे नुकसान झाले. कामासाठी ठेकेदार वर्क ऑर्डर व करार केला नाही. सीसीटीव्ही बसविण्यापूर्वी तांत्रिक अहवाल घेतला नाही बाबी चौकशीत आढळल्या आहेत. बाजार समिती अनियमिततेस आर्थिक नुकसानीला वैयक्तिक व सामुदायिकरीत्या जबाबदार का धरू नये असा सवाल करत या संदर्भात खुलासा करून आवश्यक कागदपत्रांसह हजर करण्याचे आदेश संबंधित देण्यात आले आहेत. बाजार समितीच्या संचालकांसह सचिवांना २६ जुलैला बाजार समिती कार्यालयात आवश्यक कागदपत्र प्राधिकृत चौकशी अधिकाऱ्यांच्या समक्ष सादर करण्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे. खुलासा सादर केला नाही किंवा सादर केलेला खुलासा समर्पक नसल्यास किंवा मुद्द्यांबाबत काहीही म्हणणे नाही असे गृहित धरून उपलब्ध कागदपत्रे, बाजार समितीचे दप्तर व चौकशी अहवालातील अभिप्राय ग्राह्य धरून कारवाई केली जाईल असे चौकशी अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.