निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या पोलिसांना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 05:46 AM2019-01-27T05:46:36+5:302019-01-27T05:47:30+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी लागणारे पोलीस बळ, संवेदनशील मतदान केंद्रे व भरारी पथकासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका येत्या दोन दिवसांत करण्याचेही ठरले.
नाशिक : आगामी लोकसभा निवडणूक निर्विघ्नपणे पार पडण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी यापूर्वी निवडणूक प्रक्रियेत बाधा आणणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबरोबच सराईत गुन्हेगारांचे तडीपाराचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणेला दिल्या. लोकसभा निवडणुकीसाठी लागणारे पोलीस बळ, संवेदनशील मतदान केंद्रे व भरारी पथकासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका येत्या दोन दिवसांत करण्याचेही ठरले.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन विभाग, राज्य उत्पादन शुल्क, आयकर अधिकारी व सर्व निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंंद्राचा अभ्यास करून त्यात संवेदनशील व व्हर्नाबेल मतदान केंद्रे शोधून अशा मतदान केंद्राची सेक्टर अधिकारी, तहसीलदार व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्या मतदान केंद्राच्या सुरक्षिततेचा आढावा घ्यावा त्याचबरोबर त्या ठिकाणी किती व कसा बंदोबस्त देता येईल याची माहिती गोळा करण्याचे ठरविण्यात आले.
गेल्या निवडणूक काळात समाजकंटकांवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती घेण्यात आली. किती लोकांना समन्स बजावले, तडीपार व प्रतिबंधात्मक कारवाई केलेल्यांवर यंदा बारीक लक्ष ठेवण्याचे व त्यांना नोटिसा बजावण्याचे ठरविण्यात आले. निवडणूक काळात बेकायदेशीर दारूचा साठा, विक्री व वाटप केल्याप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईची माहितीही घेण्यात येऊन, सीमा चेक नाका, बेकायदेशीर पैशांचे वाटप करण्याचे प्रकाराबाबत जागरूक राहण्याचे ठरविण्यात आले. जिल्हास्तरीय बैठकीनंतर विभागीय आयुक्त कार्यालयात नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुखांची बैठक घेऊन त्यात विभागाचा आढावा घेण्यात आला.
माहिती सादर करण्याच्या सूचना
मतदान केंद्रनिहाय पोलीस बंदोबस्त, मतपेट्या, स्ट्रॉँग रूमच्या बंदोबस्तासाठी लागणारे बळ, केंद्रीय पोलीस दल, होमगार्डची संख्या याची माहितीही गोळा करण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीत जिल्हा निवडणूक कार्यक्रमावर चर्चा करून निवडणूक अधिकाºयांनी सेक्टर आॅफिसर, मतदान केंद्रांचा रूट, कम्युनिकेशन प्लॅन, मतदान केंद्राची तयारी याबाबत आढावा घेण्यात आला. मतदानाशी संबंधित काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांची नावानिशी माहिती सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.