सिंहस्थातील साधूग्रामसाठी आरक्षित जागांच्या मालकांना नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 06:39 PM2018-03-05T18:39:08+5:302018-03-05T18:39:08+5:30

बांधकाम हटवा : मोबदला न देता महापालिकेची दांडगाई

Notice to Reserved Places for Sadhugram in Simhastha | सिंहस्थातील साधूग्रामसाठी आरक्षित जागांच्या मालकांना नोटीसा

सिंहस्थातील साधूग्रामसाठी आरक्षित जागांच्या मालकांना नोटीसा

Next
ठळक मुद्दे १५ दिवसांत बांधकामे न हटविल्यास कारवाईचा इशारा महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे ३५० एकर जागा साधूग्रामसाठी आरक्षित केलेली आहे

नाशिक - सिंहस्थ कुंभमेळा काळात साधूग्रामसाठी आरक्षित केलेल्या सुमारे साडेतीनशे एकर जागेवर विनापरवाना बांधकामे केल्याबद्दल जागा मालकांना महापालिकेने नोटीसा बजावल्या असून १५ दिवसांत बांधकामे न हटविल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र, जागामालकांना कसलाही मोबदला न देता स्वत:च्याच जागांवर उदरनिर्वाहासाठी बांधकाम करू न देणा-या महापालिकेच्या या दांडगाईबद्दल संबंधित शेतकरीवर्गाने तिव्र संताप व्यक्त केला आहे.
महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे ३५० एकर जागा साधूग्रामसाठी आरक्षित केलेली आहे. सिंहस्थात सदर जागा महापालिकेने संबंधित शेतक-यांनी वर्षभराच्या कालावधीसाठी भाडेपट्टीने ताब्यात घेऊन साधुग्रामची उभारणी केली होती. त्यावेळी, साधूग्राममध्ये विविध सुविधा पुरविताना जागेवर कच, खडी टाकण्यात येऊन ड्रेनेज, पाण्याची पाईपलाईनसाठी खोदकामही केले होते. त्यावेळी, सुमारे दहा लाख रूपये वार्षिक भाडे संबंधित जागामालकांना देण्यात आले होते. मात्र, अद्याप महापालिकेने सदर जागेचे संपादन केलेले नसून शेतक-यांनी रोख मोबदल्याऐवजी टीडीआर घ्यावा, यासाठी आग्रह धरला जात आहे. परंतु, शेतक-यांकडून नवीन भूसंपादन कायद्यानुसार वाढीव दराने रोख स्वरुपातच मोबदला मागितला जात आहे. सिंहस्थ काळ संपल्यानंतर, सदर जागांवर शेतक-यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी मंगल कार्यालये, गोडावूनचे शेड, जनावरांचे गोठे आदी बांधकामे उभारलेली आहेत. परंतु, सदर जागेवर मालकांना केवळ शेतीच करता येईल, अशी भूमिका घेत महापालिकेने जागामालकांना नोटीसा बजावत जागांवरील बांधकामे काढून टाकण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग संतप्त झाला आहे. याबाबत काही शेतक-यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच दाद मागण्याचे ठरविले आहे.
सांगा, कसे जगायचे!
सिंहस्थात साधुग्रामसाठी जागा ताब्यात घेताना त्याठिकाणी खडी, मुरूम, कच टाकून ठेवण्यात आली होती तसेच ड्रेनेज, पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईनही टाकण्यात आली होती. नंतर, संबंधित ठेकेदारांनी कच, मुरूम तसेच पाईपलाइन काढून नेली असली तरी त्यामुळे जमिनीचा पोत घसरला आहे. ती कसण्यायोग्य राहिली नसल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. त्यामुळे, जागामालकांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी त्याठिकाणी मंगलकार्यालयासह अन्य बांधकामे उभी केली आहेत. परंतु, जागेचा मोबदलाही द्यायचा नाही आणि मालकीच्या जागेवर उदरनिर्वाहासाठी काही बांधकाम करण्यासाठी परवानगीही द्यायची नाही, त्यामुळे कसे जगायचे, असा सवाल शेतकरीवर्गाकडून उपस्थित केला जात आहे.

Web Title: Notice to Reserved Places for Sadhugram in Simhastha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.