साखर विक्रीसाठी केंद्रांची कारखान्यांना नोटीस
By admin | Published: June 16, 2014 11:54 PM2014-06-16T23:54:01+5:302014-06-17T00:08:07+5:30
साखर विक्रीसाठी केंद्रांची कारखान्यांना नोटीस
नाशिक : साखरेचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश होत असल्याने साखर कारखान्यांनी त्यांच्या ताब्यातील साखरेची त्वरित विक्री करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्याला आणि राज्य सरकारने ११० हून अधिक साखर कारखान्यांना दिले असून, त्यात नाशिक व निफाड साखर कारखान्यांचा समावेश असल्याचे कळते.
विशेष म्हणजे सुमारे २५० कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी यापूर्वीच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने दोन्ही साखर कारखान्यांना १० जूनलाच नोटिसा बजावल्या आहेत. कारखान्याच्या संचालक मंडळाने त्रिपक्षीय करार करण्यास यापूर्वीच विरोध केल्याने दोन्ही साखर कारखान्यांच्या ताब्यात असलेली सुमारे ३५० पोती साखर विक्री अडचणीत आली होती. दोन्ही साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाने जिल्हा बॅँकेला आधी हंगामासाठी कर्ज द्या, मगच साखर विक्री करा, अशी विनंती केली आहे. दोेन्ही कारखान्यांचे काही संचालक शासनाकडून दोन्ही साखर कारखान्यांना सरकारी हमी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता त्यातच साखर विक्री करण्याबाबत केंद्र सरकारनेच निर्देश दिल्याने आता दोेन्ही साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाला साखर विक्री लवकरात लवकर करावी लागण्याची चिन्हे आहेत.(प्रतिनिधी)