भाजपाच्या 119 उमेदवारांना नोटिसा

By Admin | Published: February 14, 2017 12:52 AM2017-02-14T00:52:04+5:302017-02-14T00:52:15+5:30

तिकीटविक्री प्रकरण : निवडणूक अधिकाऱ्यांचा अजब कारभार

Notices for 119 candidates of BJP | भाजपाच्या 119 उमेदवारांना नोटिसा

भाजपाच्या 119 उमेदवारांना नोटिसा

googlenewsNext

नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाने उमेदवारांकडून दोन दोन लाख रुपये घेतले जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईसाठी सरसावलेल्या आचारसंहिता कक्षाने आता निवडणूक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून भाजपाच्या ११९ उमेदवारांनाच नोटिसा बजावल्या असून, पक्षाकडून घेण्यात आलेल्या कथित दोन लाखांच्या पक्षनिधीसंदर्भात तक्रार आहे काय? अशी विचारणा केली आहे. ज्यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे अशांनाच नोटिसा देण्यात आल्याने आता हाती काय लागणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी घोषित झाल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर वसंत स्मृती कार्यालयात पक्षाचे सरचिटणीस उमेदवाराकडे दोन दोन लाख रुपये मागत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याला पूरक प्रतिक्रिया आमदार सीमा हिरे यांनी दिली, तर दोन लाख रुपये पक्ष निधी असून त्याचा वापर निवडणूक कामांसाठीच होणार असल्याचे समर्थन आमदार देवयानी फरांदे यांनी केले होते. त्यानंतर आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा विषय गाजला. त्यामुळे आचारसंहिता कक्षाने भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात धडक दिली. परंतु त्यांच्याकडे कार्यालय तपासणीचे लेखी पत्र नसल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी त्यास विरोध केला आणि त्यानंतर पथक माघारी फिरकले आता पुराव्यानिशीच या कार्यालयात जाण्याची तयारी करणाऱ्या आचारसंहिता विभागाने आता सर्व निवडणूक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून भाजपाच्या ११९ उमेदवारांना नोटिसा बजावल्या असून, त्यांनाच दोन लाख रुपयांच्या मागणीबाबत तक्रार आहे का? अशी विचारणा करण्यात आली आहे. भाजपाकडे उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा असताना उमेदवारी मिळाल्याने आता असे उमेदवार खरोखरीच दोन लाख रुपये मागितल्याची तक्रार करतील काय, अशी शंका आहे. नाराज किंवा उमेदवारी डावललेल्यांकडून रकमेची मागणी झाल्याच्या त्यांच्या वृत्तपत्रातील प्रतिक्रियांवरून माहिती घेणे ठीक, परंतु ज्यांना उमेदवारी मिळाली ते पक्षाच्या विरोधात कसे काय बोलतील या विषयी शंका आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारीसाठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप आणि त्यापाठोपाठ व्हिडीओ व्हायरल झाल्याने आचारसंहिता कक्षाने पाऊले उचलली असली तरी अशाच प्रकारचे आरोप शिवसेनेच्या बाबतीतही करण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपा पाठोपाठ शिवसेनेच्या मागेही चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Notices for 119 candidates of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.